Ransom News  File Photo
हिंगोली

Aundha Nagnath Kidnapping Case | औंढा नागनाथ तालुक्यात खळबळ! घराजवळून शेतकऱ्याचे अपहरण; ११ दिवसांनी गुन्हा दाखल

उखळी येथील ३८ वर्षीय रामप्रसाद आंधळे बेपत्ता; पत्नीच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद

पुढारी वृत्तसेवा

Farmer Kidnapped In Hingoli

औंढा नागनाथ, : औंढा नागनाथ तालुक्यातील उखळी येथे राहत्या घराजवळून एका ३८ वर्षीय शेतकऱ्याचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची तक्रार आहे. तब्बल ११ दिवसांनंतर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, शेतकऱ्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

रामप्रसाद बाबुराव आंधळे (वय ३८, रा. उखळी, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) असे अपहरण झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पत्नी मुक्ता रामप्रसाद आंधळे (वय ३६) यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादीनुसार, २ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास रामप्रसाद आंधळे यांचे उखळी येथील राहत्या घराजवळून अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, मुक्ता आंधळे यांनी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजून ४९ मिनिटांनी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा क्रमांक ११६८/२०२६ अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४०(३) प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.

या प्रकरणात अद्याप संशयित आरोपींची ओळख पटलेली नाही. कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, पोलीस जमादार हरकाळ या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

दरम्यान, शेतकऱ्याचे अपहरण नेमके कोणत्या कारणातून झाले, यामागे वैयक्तिक वाद आहे की अन्य काही कारण, याबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. अपहरणामागे घातपाताची शक्यता आहे का, याचाही तपासातून उलगडा होणे अपेक्षित आहे. रामप्रसाद आंधळे यांचा तातडीने शोध घेऊन अपहरणाचे गूढ उकलावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT