Hingoli News : हळदीवर करपा व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव

हळद पिकावर मोठे संकट, विमा तत्काळ लागू करण्याची मागणी
Hingoli News
Hingoli News : हळदीवर करपा व तांबेरा रोगाचा प्रादुर्भावfile photo
Published on: 
Updated on: 

Incidence of leaf blight and rust diseases on turmeric

वसमत : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात यावर्षी हळद पिकावर मोठे संकट आले आहे. हळद पिकावर करपा व तांबेरा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, पाने पिवळी पडून करपत आहेत. पानांच्या कडा वाळून जात असल्याने हळदीची वाढ खुंटली आहे. हिरवेगार दिसणारे हळदीचे शेत आता रोगामुळे पिवळे पडून करपू लागले आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यावर्षी शेतकऱ्यांनी हळदीला चांगला भाव असल्यामुळे भरपूर प्रमाणात खर्च केला आहे. बियाणे, खते, औषधे, मजुरी, पाणी यावर मोठा खर्च करून शेतकऱ्यांनी हळदीची जोपासना केली. मात्र, ऐन वाढीच्या अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. हळदीचे उत्पन्न अपेक्षेपेक्षा खूपच कमी होण्याचे संकेत दिसत असून, यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले आहे.

शेतकऱ्यांनी वेळेत पीक विमा भरूनही अद्याप हळद पिकाचा विमा लागू करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण व पंचनामे करून हळद पिकाचा विमा तात्काळ लागू करावा आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. कृषी विभागाने शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशीही मागणी होत आहे. दरम्यान, रोग नियंत्रणासाठी शेतकरी विविध औषधांची फवारणी करत आहेत, मात्र त्याचा म्हणावा तसा परिणाम होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

यावर्षी हळदीला भाव असल्यामुळे भरपूर प्रमाणात खर्च करून सुद्धा हळदीचे उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमी होण्याचे संकेत आहेत. पीक विमा भरून सुद्धा हळद विमा लागू का केला जात नाही, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

सध्या हळद पिकातील रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेता व दुष्काळी परिस्थितीमुळे मार्केटमध्ये हळदीला तेजी दिसून येत असून, ही तेजी कायम राहण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.