Aundha Nagnath Berula Flag Dispute
औंढा नागनाथ : तालुक्यातील बेरूळा येथे झेंडा प्रकरण पुन्हा एकदा तापले आहे. ५ ऑगस्ट रोजी गावात लावण्यात आलेल्या निळ्या ध्वजामुळे तणाव निर्माण झाला होता. महसूल प्रशासनाने तो ध्वज हटवल्यानंतर दलित समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनात निळ्या ध्वजाचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
दरम्यान, वातावरण शांत होण्याआधीच ७ सप्टेंबरच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी पुन्हा त्याच ठिकाणी अनधिकृतरीत्या भगवा झेंडा लावला. या प्रकरणाची नोंद औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार हरीश गाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे, पोलीस निरीक्षक गणेश राहीरे, जमादार संदीप टाक, गजानन गीरी यांच्यासह पोलीस पथक आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता कोकडवार घटनास्थळी दाखल झाले. अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश सिन्हा यांनी गावातील मान्यवरांच्या माध्यमातून मध्यस्थी करत भगवा झेंडा खाली उतरवून घेतला.
या ठिकाणी पुन्हा तणाव निर्माण होऊ नये म्हणून महसूल प्रांताधिकाऱ्यांना सदर जागा प्रतिबंधित करण्याचे आदेश देण्यात आले असून, मुंबई पोलीस कायदा कलम १४४ अंतर्गत कार्यवाही करण्याची शिफारस केली आहे. सध्या गावात शांतता आहे. पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात आले असून, ग्रामस्थांना तहसीलदार हरीश गाडे यांनी समजावून सांगत परिस्थिती नियंत्रणात आणली.