हिंगोली

Hingoli Murder Case : आखाडा बाळापूर येथे कृषी पर्यवेक्षकाचा भोसकून खून

अविनाश सुतार

आखाडा बाळापूर, पुढारी वृत्तसेवा: येथील बिज गुणन केंद्रात कार्यालयात काम करीत बसलेल्या कृषी पर्यवेक्षकाचा शस्त्राने भोसकून खून झाल्याची घटना आज (दि.१४) दुपारी घडली आहे. घटनास्थळी आखाडा बाळापूर पोलिसांसह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहे. राजेश शिवाजी कोल्हाळ (रा. कोंडवाडा, ता. सेनगाव) असे खून झालेल्या कृषी पर्यवेक्षकाचे नाव आहे. Hingoli Murder Case

आखाडा बाळापूर शहरालगत बिज गुणन केंद्र आहे. या ठिकाणी राजेश कोल्हाळ हे पर्यवेक्षक म्हणून काम करतात. आज0 सकाळी कोल्हाळ नेहमीप्रमाणे कामकाजासाठी आले होते. गुणन केंद्राच्या परिसरात असलेल्या कृषी विभागाच्या शेतातच मशागतीचे काम सुरु होते. यावेळी काही मजूर कामावर होते. Hingoli Murder Case

दरम्यान, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कर्मचारी त्यांच्या कार्यालयात गेल्यानंतर कोल्हाळ हे रक्तबंबाळ अवस्थेत असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती तातडीने आखाडा बाळापूर पोलिसांना तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास देण्यात आली. त्यानुसार पोलीस उपाधीक्षक संदीपान शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार राजीव जाधव, शिवाजी पवार यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय कृषी अधिकारी भालचंद्र वाघ यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी कार्यालयात जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी खुर्चीमध्ये कोल्हाळ यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या पोटावर शस्त्राचे वार असल्याचे दिसून आले असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रात झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी तातडीने श्वान पथकाला पाचारण केले. या शिवाय त्या ठिकाणी काम करणार्‍या कर्मचार्‍यांकडून माहिती घेतली जात आहे. या खूनाचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. कोल्हाळ यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे.

दरम्यान, कोल्हाळ हे 2014 पूर्वी कृषी पर्यवेक्षक म्हणून विदर्भात रूजू झाले होते. एक वर्षापूर्वीच त्यांची लातुर विभागात बदली होऊन त्यांना हिंगोली जिल्हा देण्यात आला होता. तर सहा महिन्यांपासून ते आखाडा बाळापूर येथील बिज गुणन केंद्रात काम पाहात असल्याचे कृषी विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT