हिंगोली

Hingoli : कत्तलीसाठी ३० जनावरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला

मोहन कारंडे

आखाडा बाळापूर, पुढारी वृत्तसेवा : कत्तलीसाठी ३० जनावरांची वाहतूक करणारा ट्रक गोरक्षक व आखाडा बाळापूर पोलिसांनी गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वारंगा फाटा शिवारात पकडला. पोलिसांनी ट्रकसह तिघांना ताब्यात घेतले असून सर्व जनावरांच्या चार्‍याची व्यवस्था केली आहे.

एमएच-३१-सी, बी-७९८९ या ट्रकमधून ३० जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यावरून कळमनुरी येथून काही गोरक्षकांनी ट्रकचा पाठलाग सुरु केला. पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच चालकाने ट्रक भरधाव वेगाने चालविला. ट्रक साळवा-कामठा येथील टोल नाक्यावर आल्यानंतर चालकाने ट्रक न थांबवता त्या ठिकाणी वाहने थांबविण्यासाठी असलेल्या गेटला धडक देऊन पुढे नेला. त्यामुळे टोलनाक्याचे नुकसान झाले. या प्रकाराची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, राजीव जाधव, शिवाजी पवार, रोहिदास राठोड, अतुल मस्के, अविनाश चव्हाण यांच्या पथकाने व गोरक्षकांनी ट्रक पकडून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आणला. त्यातील ३० जनावरे सुखरुप बाहेर काढण्यात आली. पोलिसांनी जनावरांसाठी चारा, पाण्याची व्यवस्था केली असून पशुवैद्यकिय अधिकार्‍यांना पाचारण करून काही जनावरांवर उपचार करण्यात आले. ट्रक मालकाचा शोध घेऊन चालक व इतरांची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT