हिंगोली : इसापूर धरणात पाणी हक्‍क संघर्ष समितीच्या वतीने जलसमाधी आंदोलन

हिंगोली : इसापूर धरणात पाणी हक्‍क संघर्ष समितीच्या वतीने जलसमाधी आंदोलन

कळमनुरी; पुढारी वृत्तसेवा : ईसापूर जलाशयातून शेनोडी – रामवाडी उपसा सिंचन योजना राबविणे आणि कयाधू नदीवर बंधारे बांधावेत, या मागणीसाठी आज (दि.२१) दुपारी एकच्या सुमारास पाणी हक्‍क संघर्ष समितीच्या वतीने शेनोडी गावालगत असलेल्या इसापूर धरणात जलसमाधी आंदोलन केले.

कळमनुरी तालुक्यातील ईसापूर जलाशयातून शेनोडी – रामवाडी उपसा सिंचन योजना राबविण्या संबंधी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत कोणतीही कारवाई होत नाही. तसेच कयाधू नदीवर बंधारे बांधण्यास मान्यता द्यावी, या मागणीसाठी कळमनुरी तालुक्यातील लाभक्षेत्रातील जवळपास ६ गावातील शेतकर्‍यांनी पाणी हक्क संघर्ष समिती स्थापन केली आहे. वेळोवेळी आंदोलने करूनही अद्याप मागण्यांची दखल घेतलेली नाही.

शेनोडी- रामवाडी उपसा जलसिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता देऊन जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, कयाधू नदीवर लहान बंधारे बांधण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात उच्चस्तरीय बैठक घेऊन तत्काळ न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी अभियंता शेख व नायब तहसिलदार आनंद सुळे यांनी निवेदन स्वीकारले. या आंदोलनात पाणी हक्क संघर्ष समितीचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे, नंदकिशोर तोष्णीवाल, गोपु पाटील, सतिश पाचपुते, डॉ. दिलीप मस्के, डॉ. एल. डी. कदम, मारोतराव खांडेकर, सखाराम उबाळे, विनोद बांगर आदीसह शेतकरी, महिला सहभागी झाले होते.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news