file photo
file photo

हिंगोली : विधी संघर्षग्रस्त मुलाकडून छऱ्याचे पिस्तूल जप्त

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : शहरातील आझम कॉलनी भागात एका विधी संघर्षग्रस्त मुलाकडून पोलिसांच्या विशेष पथकाने छऱ्याचे पिस्तूल जप्त केले. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात आज (दि.२१) दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. गावठी पिस्तूलासारखे दिसणारे हे पिस्तूल पाहून पोलिसही चक्रावून गेले. मात्र अधिक तपासणीत ते छऱ्याचे पिस्तूल असल्याचे स्पष्ट झाले.

शहरातील आझम कॉलनी भागात मंगळवारी (दि.२०) सकाळी आकराच्या सुमारास एक विधी संघर्षग्रस्त मुलगा विनाकारण गोंधळ घालत असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार विशेष पथकाचे उपनिरीक्षक माधव जिव्हारे, जमादार अमित जाधव, विनोद दळवी, शेख मोहसीन, गजानन कोठूळे यांनी आझम कॉलनी परिसरात जाऊन पाहणी केली. व त्या मुलाची चौकशी करून त्याची तपासणी केली. तपासणीत त्याच्याकडे छऱ्याचे पिस्तूल आढळून आले. त्यानंतर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी जमादार संजय मार्के पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news