Hingoli Farmer Loan Waiver pudhari photo
हिंगोली

Hingoli Farmer Loan Waiver : ओटीएस योजनेसाठी १९२५ शेतकरी पात्र

३१ मार्चपर्यंत कर्जाचा हिस्सा भरण्याची मुदत, पहिली यादी प्रसिद्ध

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली :पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेसाठी हिंगोली जिल्ह्यातील १ हजार ९२५ शेतकरी पात्र ठरले आहेत. या पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपल्या हिश्श्याची रक्कम संबंधित बँकेत ३१ मार्च २०२७ पर्यंत जमा करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सुरेखा फुपाटे यांनी केले आहे.

प्रसिद्ध यादीमध्ये शेतकऱ्याचे नाव, गाव, विशिष्ट क्रमांक, बँक कर्जखात्याचा तपशील आणि कर्जाची रक्कम नमूद केली आहे. यादीतील रकाना क्रमांक नऊमध्ये ३१ मार्च २०२६ अखेरची थकबाकी, रकाना दहामध्ये एकवेळ समझोत्यानुसार थकबाकी, अकरामध्ये शेतकऱ्याने भरावयाची रक्कम, तर बारामध्ये शासनाकडून मिळणाऱ्या लाभाची रक्कम दिली आहे.

या योजनेत कर्जमाफी, एकवेळ समझोता आणि प्रोत्साहन असे तीन घटक आहेत. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी हिंगोली जिल्ह्यातील ८० हजार ७५६ शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ६९ हजार ९१७ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ४०९.७४ कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे.दुसऱ्या टप्प्यात एकवेळ समझोता योजनेतील पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचा कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.

यासाठी शेतकऱ्यांनी दोन लाख रुपयांवरील आपल्या हिश्श्याची रक्कम बँकेत जमा करणे आवश्यक आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे.ज्या शेतकऱ्यांचे कर्जखाते एकाच बँकेत आहे, त्यांनी यादीतील रकाना क्रमांक अकरामध्ये नमूद केलेली रक्कम संबंधित बँकेच्या कर्जखात्यात जमा करावी. एकापेक्षा अधिक कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांना आपल्या हिश्श्याची रक्कम कोणत्याही एका कर्जखात्यात भरण्याची सुविधा आहे.

मात्र, कोणत्याही एका खात्यात रकाना क्रमांक दहामध्ये नमूद केलेल्या रकमेपेक्षा किंवा एकवेळ समझोत्यानुसार बँकेस देय असलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम भरू नये. रक्कम भरण्यापूर्वी शेतकऱ्यांनी बँकेकडून योग्य माहिती घ्यावी. बँक अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करावे.शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेची अद्ययावत माहिती बँकांकडून दर शुक्रवारी पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. ही माहिती अपलोड केल्याचे बँकेने संबंधित शेतकऱ्याला कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर महाआयटीमार्फत पोर्टलवर रक्कम भरल्याची पडताळणी केली जाईल.

अद्ययावतीकरणानंतर तीन दिवसांनी संबंधित शेतकऱ्याला आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध होईल.योजनेचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी प्रथम ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी. त्यानंतर जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करावे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकषांनुसार दोन लाख रुपयांपर्यंतची लाभाची रक्कम थेट कर्जखात्यात जमा केली जाईल.

शासनाकडून ही रक्कम वर्ग झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याची कर्जमुक्ती होईल.एकवेळ समझोता योजनेची ही पहिली यादी आहे. बँकांकडून प्राप्त होणाऱ्या माहितीचे संगणकीय संस्करण करून पात्र शेतकऱ्यांच्या पुढील याद्याही टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. तसेच मयत, वयोवृद्ध आणि बोटांचे ठसे नोंदविण्यात अडचण येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानक कार्यप्रणाली (एसओपी) निर्गमित करण्यात आली आहे.

  • पात्र शेतकऱ्यांनी यादीतील तपशील तपासून विहित मुदतीत आपल्या हिश्श्याची रक्कम जमा करावी आणि आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT