हिंगोली

हिंगोली : तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ कात टाकणार; विकासासाठी १५ कोटींचा निधी मंजूर

मोहन कारंडे

हिंगोली; गजानन लोंढे : मागील अनेक वर्षापासून आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथच्या विकासासाठी केवळ आराखडा प्रस्तावित होता. राज्य शासनाने आता तीर्थक्षेत्र विकासासाठी पहिल्या टप्प्यात १५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून मंदिराच्या नुतनीकरणासह येणार्‍या भाविकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले औंढा नागनाथ हे तीर्थक्षेत्र आहे. येथे देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. इतर ज्योतिर्लिंगाच्या तुलनेत औंढा येथे सुविधांची कमतरता आहे. त्यामुळे भाविक मुक्‍कामी न थांबताच दर्शन झाले की निघून जातात. त्यामुळे येथील इतर विकासही खोळंबला आहे. आमदार संतोष बांगर यांनी येथील विकासासाठी ६० कोटींचा आराखडा शासनाकडे सादर करून पाठपुरावा केला होता. छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत आराखड्याला मंजूरी देण्यात आली होती. त्यानंतर १ डिसेंबर रोजी राज्य शासनाने १५ कोटींच्या निधीस मान्यता दिली. या निधीतून प्राथमिक स्तरावरची कामे होणार आहेत. संपूर्ण विकासासाठी अजून किमान ५० कोटी निधीची आवश्यकता आहे.

पहिल्या टप्प्यात १५ कोटींचा निधी मिळाला असला तरी दुसर्‍या टप्प्यात ५० कोटीपेक्षा अधिक निधी उपलब्ध होईल. यासाठी सुधारित प्रस्ताव पाठविला जाईल, असे आमदार बांगर यांनी सांगितले. औंढा नागनाथच्या विकासासाठी आता हालचाली गतीमान झाल्या आहेत. येत्या काही वर्षात येथील विकासकामे पूर्ण होऊन भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध होतील असे संकेत मिळत आहेत.

१५ कोटी २१ लाखाच्या निधीपैकी पुरातत्व विभागाला ७ कोटी ४५ लाख रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. या निधीतून पुरातत्व विभाग मंदिराचे नुतनीकरण, केमिकल कन्झर्वेशन (हळदी-कुंकू व तेलाचे डाग काढणे) आदी कामे केली जाणार आहेत. मंदिर पूर्ण दगडात कोरीव कामाने बांधण्यात आले आहे. अनेक वर्षापासून मंदिराचे नुतनीकरण झाले नसल्याने मुळ मंदिराचा गाभा कायम ठेवून पुरातत्व विभागाकडून कामे केली जाणार आहेत.

येथे येणार्‍या भाविकांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ७ कोटी ७६ लाखांच्या निधीतून स्वागत द्वार, सुरक्षा भिंत, पोलीस मदत केंद्र, दुकाने, कार्यालय, भक्‍त निवास, दिपमाळ, दगडी पाथवे, अंतर्गत रस्ते आदींची कामे केली जाणार आहेत. ही कामे वर्षभरात पुर्ण झाल्यानंतर मंदिर परिसर अधिक आकर्षक होणार आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने उपाययोजना गरजेची

दरवर्षी नागनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. परंतू येथे इतर पर्यटनाच्या सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे भाविक मुक्‍कामी थांबत नाहीत. माजी केंद्रीयमंत्री सुर्यकांता पाटील यांच्या प्रयत्नातून येथे उद्यान विकसित करण्यात आले आहे. परंतू ते ही आता सुस्थितीत नाही. मंदिराच्या काही अंतरावरच तलाव आहे. या दृष्टीने पर्यटन वाढीस वाव आहे. राज्य शासनाने पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास केल्यास भाविकांसह पर्यटकांनाही औंढा नागनाथ येथे वेळ घालण्याची संधी मिळणार आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT