राजर्षी शाहू कॉलेजच्या इमारतीला आग file photo
हिंगोली

Hingoli News : राजर्षी शाहू कॉलेजच्या इमारतीला आग

संगणक लॅबसह कार्यालय खाक, शार्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

Fire breaks out at Rajarshi Shahu College building

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शहरालगत तिरुपती नगर भागातील राजर्षी शाहू आर्टस्, कॉमर्स, सायन्स व आयटी कॉलेजच्या इमारतीला शनिवारी रात्री अचानक आग लागली. या आगीमध्ये कार्यालयातील सर्व साहित्य व संगणक लॅब जळून खाक झाली. शार्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता असून यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले.

शहरालगत तिरुपती नगर भागात एशिया ग्रुप महिला मंडळ जालनाद्वारा संचलित राजर्षी शाहू आर्टस्, कॉमर्स, सायन्स व आयटी कॉलेज आहे. या ठिकाणी सुमारे ३०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. या कॉलेजमध्ये अत्याधुनिक संगणक लॅब आहे. नेहमी प्रमाणे शनिवारी या कॉलेजमध्ये सकाळी विद्यार्थ्यांचे वर्ग झाले. त्यानंतर रात्री कॉलेजच्या कार्यालयास अचानक आग लागली.

कार्यालयातून आगीचे लोळ उठल्यानंतर परिसरात धूर निघू लागला. पाहता पाहता आगीने रौद्र रुप धारण केले. त्यानंतर कार्यालयात लागलेली आग शाहु कॉलेजला लागलेली आग विझवताना जवान.

संगणक लॅब पर्यंत पसरली. या कॉलेजला आग लागल्याचे लक्षात येताच माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी तातडीने हिंगोली पालिकेला माहिती दिली. पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे, अग्नीशमनदल प्रमुख अक्षय तांडेल, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्यासह पथकाने अग्नीशमनदलास घटनास्थळी रवाना केले. तसेच पोलिस निरीक्षक संदीप मोदे, जमादार अशोक धामणे, संतोष करे, शेख मुजीब, गणेश लेकुळे, गणेश वाबळे, जोगे, शंकर ठोंबरे, संजय मार्के यांच्या पथकानेही घटनास्थळी धाव घेतली.

अग्नीशमन दल व पोलिसांच्या पथकाने आगीवर पाणी ओतण्यास सुरवात केली. सुमारे दोन तासानंतर आग काही प्रमाणात आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत कार्यालयातील सर्व दस्ताऐवज व संगणक तसेच संगणक लॅब मधील सर्व १० पेक्षा अधिक संगणक जळून खाक झाले.

शार्ट सर्किटमुळे आग लागली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या आगीमध्ये कॉलेजचे सुमारे २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज संस्थेचे अध्यक्ष आसेफ कुरेशी यांनी व्यक्त केला.

संगणक आगीच्या भक्षस्थानी

या आगीत कार्यालयातील सर्व दस्ताऐवज व संगणक तसेच संगणक लॅब मधील सर्व १० पेक्षा अधिक संगणक आगीच्या भक्षस्थानी सापडल्याने जळून खाक झाले आहेत. कागदपत्रासह संगणक जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT