Fed up with debt, a young farmer ended his life.
वसमत; पुढारी वृत्तसेवाः
सततची नापिकी आणि डोक्यावर असलेल्या कर्जाच्या ओझ्याला कंटाळून तालुक्यातील हापसापूर येथील एका ४० वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. नरहरी सवंडकर असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. १८) हट्टा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नरहरी सवंडकर यांची हापसापूर शिवारात दोन एकर शेती आहे. याच शेतीवर त्यांच्या पत्नी, मुलगा आणि मुलगी या चौकोनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. शेतीसाठी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून ९९ हजार रुपयांचे पीककर्ज घेतले होते.
मात्र, खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले. सध्या शेतात गहू आणि ऊस उभा आहे, परंतु कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा आणि बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत ते गेल्या काही दिवसांपासून होते. त्यांनी ही चिंता आपल्या भावांजवळ आणि कुटुंबीयांजवळ अनेकदा बोलून दाखवली होती.
शनिवारी दुपारी घरी कोणी नसताना नरहरी यांनी राहत्या घरी गळफास घेतला. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना टेंभूर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.