Hingoli Earthquake : हिंगोली जिल्ह्यात पहाटे भूकंपाचा तीव्र धक्का; नागरिकांमध्ये भीती File Photo
हिंगोली

Earthquake : हिंगोली-नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

आखाडा बाळापूर, वारंगा परिसरात शनिवारी सकाळी ८.४६ वाजता भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला.

पुढारी वृत्तसेवा

Earthquake Tremors in Hingoli and Nanded Districts; Atmosphere of Fear Among Residents

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा आखाडा बाळापूर, वारंगा परिसरात शनिवारी सकाळी ८.४६ वाजता भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला, त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, धक्का बसण्यापूर्वी जमिनीतून कर्कश आवाज ऐकू आला, त्यानंतर काही सेकंद परिसर हादरल्याची जाणीव झाली.

अचानक बसलेल्या या धक्क्यामुळे गावातील नागरिक घाबरून घरांबाहेर पडत रस्त्यावर थांबले. अनेकांनी काही क्षण भीतीपोटी मोकळ्या जागेकडे धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

कळमनुरी-हिंगोली परिसरात यापूर्वीही किरकोळ भूकंपाचे धक्के जाणवले होते. डिसेंबर २०२५ मध्ये याच भागात सुमारे ३.५ रिश्टर तीव्रतेचा धक्का नोंदवला गेला होता.

आज सकाळी 8:45 च्या सुमारास हिंगोलीत भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल इतकी होती. तर खोली 10 किमी इतकी होती.
डॉ साकेब उस्मानी लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

औंढा तालुक्यात काही ठिकाणी सौम्य तर काही ठिकाणी तीव्र भूकंपाचे धक्के

औंढा नागनाथ तालुक्यात शनिवारी सकाळी सुमारे ८.४५ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे आणि वापटी परिसरात असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे औंढा तालुक्यातील पिंपळदरी परिसरासह जवळच्या भागात भूकंपाची तीव्रता ४.७ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली.

या तीव्र धक्क्यांचा परिणाम नांदापूर, जामगव्हाण, राजदरी, सोनवाडी, आमदरी, टेंभूरदरा, कंजारा, वसई, पूर, जलालदाभा आणि काकडदाभा या गावांमध्ये जाणवला. सुमारे ४० सेकंद जमिनीचा कंपन झाल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पडले.

दरम्यान, औंढा परिसरातील येहळेगाव, लाख, बोरजा, साळणा, माथा, ढेगज, सिद्धेश्वर, रुपूर, जलालपूर, उखळी, पोटा खुर्द, पेरजाबाद आणि बेरुळा या गावांमध्ये केवळ ६ ते ७ सेकंद सौम्य धक्के जाणवले.

या संदर्भात तहसीलदार हरीश गाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे कुठेही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांत राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT