

Earthquake in Aundha Taluka
औंढा नागनाथ : तालुक्यात मंगळवारी (दि. २५) सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी अंदाजे ८ वाजून १० मिनिटांच्या सुमारास हा भूकंप झाला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.४ इतकी नोंदवण्यात आली आहे.
या भूकंपाचा केंद्रबिंदू पांगराशिंदे आणि वापटी परिसरात असल्याचे जात आहे. भूकंपाचे धक्के आमदरी, राजदरी, फुलवाडी, सोनवाडी, फुलदाभा,जामगव्हाण, पिंपळदरी, जलालदाभा, कंजारा, वसई, नांदापूर, जामगव्हाण, बोल्डावाडी आदी या गावांमध्ये जाणवले.
सकाळच्या वेळेत अचानक धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक नागरिक घराबाहेर पडून सुरक्षित ठिकाणी थांबले. सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार गाडे यांनी दिली.
भूकंपाची तीव्रता कमी असल्याने हा सौम्य भूकंप असून घाबरण्याचे कारण नाही. मात्र, संभाव्य पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.