Crime against young man and friends who kidnapped girl
सेनगाव, पुढारी वृत्तसेवा: सेनगाव पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात अल्पवयीन मुलीस पळवणाऱ्या एका तरुणासह त्याला मदत करणाऱ्या दोन मित्रांवर सेनगाव पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात फरार असलेल्या आर ोपींच्या शोधासाठी सेनगाव पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
सेनगाव पोलिस ठाण्यांतर्गत एका गाव शिवारात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस दुर्वेश हुलगुंडे याने आमिष दाखवून मुलगी राहात असलेल्या आखाड्यावरून पळवले. मुलगी घरात दिसत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. तिच्या कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे मुलगी आली का याची चौकशी केली.
मात्र मुलगी नातेवाईकांकडे नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मुलीस दुर्वेश हुलगुंडे याने पळवल्याची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाली. त्याला त्याचे दोन मित्र सुनील नरवाडे व वैभव राहटे यांनी मदत केल्याचेही स्पष्ट झाले. मुलीस फूस लावून पळविल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी रात्री थेट सेनगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी वरील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल होताच दुर्वेशच्या दोन्ही मित्रांनी पळ काढला असून या सर्व फरार आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. त्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक मारोती सोनकांबळे, जमादार जीवन मस्के, सुभाष चव्हाण यांनी पथके स्थापन केली आहेत. या पथकाकडून आरोपींचा व मुलीचा शोध सुरू करण्यात आला आहे.