

जवळाबाजार : श्रीक्षेत्र शेगाव येथून आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री गजानन महाराज पालखीचे शुक्रवारी (१४ जून) सायंकाळी जवळाबाजार येथे आगमन होत आहे. सलग ५६ व्या वर्षी पंढरीच्या वाटेवर असलेल्या या पालखीच्या स्वागतासाठी आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी येथील भाविक भक्तांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.
श्री गजानन महाराज पालखीने २ जून रोजी सुमारे ७०० वारकऱ्यांसह पंढरपूरकडे प्रस्थान केले. "गण गण गणात बोते"च्या गजरात मार्गक्रमण करत ही पालखी श्रीक्षेत्र औंढानागनाथ येथून जवळाबाजारमध्ये सायंकाळी ६ वाजता दाखल होणार आहे. बसस्थानकापासून गावातील मुख्य मार्गावरून टाळमृदंगाच्या गजरात पालखीचे स्वागत करण्यात येणार असून, जिल्हा परिषद शाळेत पालखीचा मुक्काम असेल.
भाविक भक्तांनी पालखी मार्गावर ठिकठिकाणी सुंदर रांगोळ्या काढल्या असून, आकर्षक सजावट केली आहे. वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व इतर आवश्यक सुविधांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था सुरेखा अशोक सावजी जैन, सचिन अशोक सावजी जैन, संदीप अशोक सावजी जैन आणि जैन परिवाराकडून जागृत मारोती मंदिराच्या वेशीमध्ये करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीनेही पालखी मार्गावरील रस्त्यांची डागडुजी, पथदिव्यांची व्यवस्था आणि स्वच्छतेची कामे हाती घेतली आहेत. बसस्थानकापासून जिल्हा परिषद शाळेपर्यंतच्या मार्गावर अनेक दुकानदारांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपल्या घरासमोर आणि दुकानांसमोर रांगोळ्या काढून परिसर सुशोभित केला आहे.
शनिवारी (१५ जून) सकाळी ५ वाजता श्री गजानन महाराज पालखी बाराशिव, हट्टा, झिरोफाटा मार्गे परभणी जिल्ह्यातील श्रीक्षेत्र त्रिधारा येथे मुक्कामासाठी प्रस्थान करेल. त्यानंतर परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, बार्शी, कुर्डूवाडीमार्गे ही पालखी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे. संपूर्ण पालखी मार्गावर भाविक भक्तांकडून चहा, पाणी, फराळ, भोजन आणि रात्रीच्या मुक्कामाची सोय मोठ्या उत्साहात करण्यात येत आहे.