College girl kidnapped and raped
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : सेनगाव पोलिस ठाण्यांतर्गत एका महाविद्यालयीन तरुणीला पळवून नेऊन तिच्यासोबत लग्न केल्याचे भासवून अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिस ठाण्यात पाच जणांवर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सेनगाव पोलिसांचे पथक तातडीने आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले आहेत.
सेनगाव पोलिस ठाण्यांतर्गत एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा गजानन चिलगर या तरुणाने छेड काढून विनयभंग केला. सदर प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने शिक्षण बंद होईल या भीतीने सदर घटना कोणालाही सांगितली नाही. त्यानंतर गजानन याने इतरांच्या मदतीने त्या तरुणीला बळजबरीने कारमध्ये टाकून नाशिक येथे नेले.
त्या ठिकाणी त्या तरुणीच्या इच्छेविरुध्द विवाह केला. तसेच तिच्यावर अत्याचार केला. सदर प्रकार कोणाला सांगितल्यास तुला व तुझ्या भावाला जिवे मारून टाकूत अशी धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने सदर प्रकार सुरुवातीला कोणाला सांगितला नाही. मात्र गजाननकडून मिळत असलेल्या धमक्यांना कंटाळून तरुणीने सदर प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगितला. या प्रकारामुळे तरुणीचे कुटुंबीयदेखील हादरून गेले. त्यांनी तरुणीला घेऊन थेट सेनगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी गजानन चिलगर, अंकुश चिलगर, गणेश चिलगर यांच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना
पोलिस उपाधीक्षक राजकुमार केंद्रे, सहायक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक रवीकिरण खंदारे, जमादार सुभाष चव्हाण, पोले यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणात आरोपींच्या शोधासाठी सेनगाव पोलिसांनी तातडीने पथक रवाना केली असून आरोपींचा कसून शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. उपनिरीक्षक खंदारे पुढील तपास करीत आहेत.