Break the lock movement as the hostel is closed
कळमनुरी, पुढारी वृत्तसेवा :
शहरातील अल्पसंख्याक वसतिगृह सन २०१५ पासून बंद आहे. याविरुद्ध नागरिकांनी कुलूप फोडो आंदोलन करीत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसह त्वरित वसतिगृह सुरू करण्याची मागणी केली. आंदोलनात अल्पसंख्याक समाजाचे विद्यार्थी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नागरिक सहभागी झाले होते.
ग्रामीण भागातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून शहरात शिक्षणासाठी सोयीसुविधेसाठी अल्पसंख्याक वसतिगृहाची अद्यावत इमारत असताना मागील दहा वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. बंद अवस्थेमुळे सुमारे २००० विद्यार्थी वसतिगृहाच्या सुविधांपासून वंचित राहिले आहेत.
त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होत असल्याने शहरातील अनेक जागरूक नागरिकांनी या बाबीकडे लक्ष घालत वसतिगृह सुरू करण्याची मागणी केली तसेच या वसतिगृहाचे कुलूप तोडो आंदोलन केले. वसतिगृहाच्या बांधकामाबाबत संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा तसेच दुर्लक्षतेमुळे वसतिगृहातील ५ ते ६ लाख रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याचे देखील उघड झाले आहे.
आंदोलनकर्त्यांनी या वसतिगृहावर लावण्यात आलेले मालमत्ता कर आणि अन्य शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. कळमनुरी नगरपालिका अंतर्गत वसुल करण्यात आलेले एकूण ७ लाख ६७ हजार ५४९ रुपये कर रद्द करावेत, अशी मागणी करण्यात आली. तसेच एम.एस.ई.बी कनेक्शन चार्जवर संबंधित उपकार्यकारी अभियंता महावितरण यांची चौकशी याबाबत मागणी केली. वसतिगृहासाठी एक ट्रान्सफार्मर बसविण्यात आलेली नाही यावर लक्ष वेधले गेले. आंदोलकांनी सरकारकडे वसतिगृहाचे पुनःउद्घाटन लवकरात लवकर करण्याची आणि संबंधित अधिका-यांविरुद्ध उचित कारवाईची मागणी केली आहे.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपू पाटील, संतोष सारडा, राजू संगेकर, मुस्लिम सेवा संघाचे शेख अमेर, शेख अय्यूब, एजाज बागवान, म रफिक, समाधान पाईकराव, साजिद राज खान, फैसल खान, विजू लष्कर, करण लष्कर, बापजी काळे, शंकर धनगर, गंगुबाई लष्कर, कांताबाई धोत्रे, सुमनबाई लष्कर, शोभाबाई बडगे, कविता पवार व इतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष इंगळे, रघुनाथ शेवाळे, गजानन होळकर यांनी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.