Banana plantations destroyed by stormy winds.
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात शनिवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कळमनुरी व वसमत तालुक्यात केळी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार केळीच्या बागांचे सुमारे २० कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तर हिंगोली तालुक्यातील पहेणी येथे ६० ते ७० घरावरील टीनपत्रे उडून गेली आहेत.
वसमत व कळमनुरी तालुक्यात केळीचे पीक अधिक प्रमाणात घेतले जाते. सध्या केळीचे घड काढणीला आले असून काही ठिकाणी घडांची काढणी करून विक्रीही केली जात आहे. नांदेड व इतर ठिकाणी केळीला सध्याच्या स्थितीत २६५० रुपये क्विंटल दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात शनिवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. वसमत तालुक्यातील बागल पार्टी, कुरुंदा, गिरगाव, वसमत यासह परिसरात केळीच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. तसेच कळमनुरी तालुक्यात डोंगरकडा, सालापूर, रेडगाव, वडगाव, डिग्रस, दांडेगाव, जवळा पांचाळ या भागात केळीचे नुकसान झाले आहे. या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत.
त्यानुसार उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते, विकास माने, तहसीलदार जीवककुमार कांबळे, सागर ननावरे तातडीने मंडळ अधिकारी व तलाठी यांची पथके स्थापन करून पंचनामे सुरु केले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार वसमत तालुक्यात ४० हेक्टर क्षेत्रावरील केली पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दोन तालुक्यात मिळून एकंदरीत २० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. कळमनुरी तालुक्यात झालेल्या नुकसानीची आमदार संतोष बांगर तर वसमत तालुक्यात आमदार राजू पाटील नवघरे यांनी भेट देऊन पाहणी केली. तर हिंगोली तालुक्यातील पहेणी येथे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी मुटकुळे यांनी भेट देऊन पाहणी केली.
प्रशासनाकडून पंचनाम्यांचे काम सुरू असून रविवारी दिवसभर अधिकारी व पथकाने पंचनामे केले. लवकरच नेमके नुकसानीची आकडेवारी हाती येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आता शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा आहे.