हिंगोली

Hingoli railway station : हिंगोली रेल्वे स्थानकावर मालगाडीच्या इंजिनचे एक्सल जाम; प्रवाशांची प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी धावपळ

अविनाश सुतार

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोली रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर मालगाडीच्या इंजिनचे एक्सेल जाम झाल्यामुळे सदर इंजन या प्लॅटफॉर्मवर उभे करण्यात आले. त्यामुळे शनिवारी हिंगोली रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरून सोडण्यात आल्या. यामुळे प्लॅटफॉर्म बदलताना प्रवाशांची मोठी धावपळ झाली. Hingoli railway station

हिंगोली शहरामध्ये असलेल्या रेल्वे स्थानकाची रचनाच विचित्र पद्धतीने आहे. हिंगोली शहर प्लॅटफॉर्म क्रमांक दोन कडे येते. तर रेल्वे खात्याने शहराच्या दुसऱ्या बाजूने प्लॅटफॉर्म क्रमांक एक तयार केला आहे. त्यामुळे प्रवाशांना एक नंबर प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी सुमारे एक किलोमीटरचा विळखा घालून जावा लागतो. रेल्वे स्थानकाचा प्लॅटफॉर्म क्रमांक दोन हाच मुख्य प्लॅटफॉर्म करावा, अशी मागणी प्रवाशांतून अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र, त्याकडे रेल्वेखात्याचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. Hingoli railway station

दरम्यान, शुक्रवारी रात्री नऊ वाजता अकोला मार्गे गाजियाबाद कडे जाणारी मालगाडी हिंगोली रेल्वे स्थानकावर आली. यावेळी मालगाडीचे इंजिन शंटींग ( बाजू बदलत ) करत असताना एका इंजिनचे एक्सल जाम झाले. त्यामुळे मोठ्या प्रयत्नानंतरही इंजिन जागचे हललेच नाही. त्यानंतर रात्री बारा वाजता सदर नादुरुस्त इंजिन प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर उभे करूनच मालगाडी अकोल्याकडे रवाना झाली.

त्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर नादुरुस्त इंजन असल्यामुळे पूर्णा -अकोला, अकोला -पूर्णा, हैदराबाद -जयपुर, कोल्हापूर – नागपूर, अकोला -तिरुपती, नरखेड – काचीगुडा या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उभ्या करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, नेहमीप्रमाणे या रेल्वेगाड्यातून प्रवास करणारे प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आले होते. मात्र, रेल्वे गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर येणार असल्याच्या सूचना मिळाल्यानंतर प्रवाशांची मोठी धावपळ झाली. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांग प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. त्यांना लोखंडी दादरा सोडून प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर यावे लागले. या प्रकारामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.

या संदर्भात रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता मालगाडीचे एक्सेल जाम झाले असून त्यामुळे या रेल्वे गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरून सोडण्यात आल्या. सिकंदराबाद येथून दुरुस्तीसाठी कर्मचारी येणार असून सायंकाळी उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले आहे.

हिंगोलीतील सामाजिक कार्यकर्ते गणेश साहू म्हणाले की, हिंगोली येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनला मुख्य प्लॅटफॉर्म करावा, अशी मागणी आहे. यासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदन दिले आहे. मात्र, आता या घटनेमुळे प्रवाशांचे झालेले हाल लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने दखल घेतली पाहिजे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT