Art Teachers Express Concern Over Shortcuts in Painting
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा :
सध्याच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता एआय तंत्रज्ञानाने सर्वच क्षेत्रांत शिरकाव केला असून, आता याचा मोठा फटका चित्रकला क्षेत्रालाही बसू लागला आहे. जेमिनी किंवा चॅटजीपीटी सारख्या एआय साधनांद्वारे अवघ्या काही सेकंदात तयार होणाऱ्या चित्रांना स्वतःची कला म्हणून मिरवण्याचा प्रकार वाढला असून, यामुळे मूळ कलासाधना आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेवर गदा येण्याची भीती महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे राज्य प्रसिद्धी प्रमुख व जिल्हाध्यक्ष शिवाजी आर.निळकंठे यांनी व्यक्त केली.
साताऱ्यात होणाऱ्या ४४ व्या राज्यस्तरीय कलाध्यापक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर निळकंठे यांनी या गंभीर समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. निळकंठे यांनी स्वतः एक प्रयोग करून पाहिला. त्यांनी एआयला फक्त ग्रामीण जीवनाचे पेन्सिल रेखाचित्र असा प्रॉम्प्ट दिला आणि आश्चर्य म्हणजे, काही सेकंदात संगणकाने हुबेहूब मानवी हाताने काढल्यासारखे चित्र तयार करून दिले.
या अनुभवावरून त्यांनी सावध केले की, जर ही चित्रे एखाद्या चित्रकाराने स्वतःच्या नावाने प्रसिद्ध केली, तर सामान्य रसिकच काय पण सुशिक्षित लोकही सहज फसू शकतात. पुढे बोलताना निळकंठे म्हणाले की, चित्रकला ही केवळ एक कागदावर उमटलेला निकाल नाही, तर ती एक दीर्घकालीन साधना आहे. रंगांचा वास, ब्रशचा स्पर्श आणि तासनतास घेतलेली मेहनत यातून मिळणारा आत्मिक आनंद एआयच्या एका क्लिकमध्ये कधीच असू शकत नाही.
एआयने बनवलेले चित्र देखणे असू शकते, पण त्यात कलाकाराचा घाम आणि भावना नसल्यामुळे ते जिवंत नसते. कलाशिक्षकच जर अशा शॉर्टकटचा अवलंब करू लागले, तर उद्याचा विद्यार्थी स्केचिंग आणि रंगांचा सराव का करेल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यामुळे भविष्यातील चित्रकारांची निरीक्षणशक्ती आणि हस्तकौशल्य लोप पावेल. एआय हे फक्त कल्पनेसाठी एक साधन असावे, पण त्याला कलेचा पर्याय बनवणे ही नैतिक फसवणूक असल्याचे निळकंठे यांनी स्पष्ट केले.
तंत्रज्ञान बदलत राहील, पण मानवी संवेदना आणि हाताचे कौशल्य चिरंतन आहे. आपण तंत्रज्ञानाचे मालक बनून आपली मूळ कला जिवंत ठेवली पाहिजे, त्याचे गुलाम होता कामा नये अशी प्रतिक्रिया शिवाजी निळकंठे यांनी दिली.