हिंगोली: जिल्ह्यातील अनेक हॉटेल, ढाबे, फास्टफूड सेंटर, बेकरी आणि खाद्यपदार्थ विक्रेते तळणासाठी वापरलेले गोडतेल वारंवार वापरत असून नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर स्वरूपाचा खेळ सुरू असल्याचा आरोप विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलने केला आहे.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तळणासाठी वापरलेले तेल पुन्हा-पुन्हा उच्च तापमानात गरम केल्याने त्यामध्ये विषारी रासायनिक घटक निर्माण होतात. यामुळे कर्करोग, हृदयरोग, यकृत विकार, उच्च रक्तदाब आणि पचनसंस्थेचे गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. नियमांनुसार ठराविक मर्यादेपेक्षा जास्त वापरलेले तेल वापरण्यास मनाई असतानाही अनेक ठिकाणी नियमांचे उघड उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे संबंधित अन्न सुरक्षा अधिकारी आणि भेसळ निरीक्षक दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबवून तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत, दोषी व्यावसायिकांचे परवाने रद्द करावेत तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्यांची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.