Hingoli News
वसमत : वसमत तालुक्यातील आकोली येथे अनेक दिवसांपासून तोतया डॉक्टर बनून दवाखाना चालवणाऱ्या तरुण कुमार मलीक याच्यावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. तालुका आरोग्य अधिकारी संदीप काळे यांच्या फिर्यादीवरून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, या कारवाईनंतर ग्रामीण भागातील जनतेमध्ये अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आकोलीसारख्या गावात गेली दोन वर्षे एक व्यक्ती कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना, केवळ १० वी पास असताना डॉक्टर म्हणून रुग्ण तपासत होता, औषधे देत होता. हे सर्व आरोग्य विभागाला याच्या अगोदर माहीत नव्हते का, असा थेट सवाल गावकरी करत आहेत. जर आरोग्य विभागाचे कर्मचारी गावात नियमित भेटी देतात, तर हा बोगस दवाखाना त्यांच्या नजरेस कसा पडला नाही?
स्थानिक प्रशासनाच्या मदतीनेच तो या गावात राहत होता का, असाही आरोप आता गावात दबक्या आवाजात केला जात आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी यांना दरमहा हप्ते दिले जात होते का, आणि कारवाई झाली त्यावेळी हप्ता दिला नसल्यामुळे त्याच्यावर बोगस डॉक्टर म्हणून कारवाई झाली का, असा खळबळजनक सवाल ग्रामीण भागातील जनता करत आहे. या प्रश्नांना अजून अधिकृत उत्तर मिळालेले नाही.
या प्रकरणात रोहन मेडिकलच्या नावाने दवाखाना चालवला जात होता. दुसऱ्याच्या फार्मसी लायसन्सचा वापर करून हा सर्व प्रकार सुरू होता. या1वेळी पथकाने स्टेथोस्कोप, बी.पी. अप्परेटस, नेब्युलायझर, सलाईन, इंजेक्शन असा ४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. फ्रिजमध्ये योग्य तापमानाशिवाय ठेवलेली १६ टी.टी. इंजेक्शनही आढळली.
या कारवाईचे गावकऱ्यांनी स्वागत केले असले, तरी फक्त एकाच बोगस डॉक्टरवर कारवाई करून चालणार नाही. तालुक्यात असे आणखी किती बोगस डॉक्टर आहेत, त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे, याची सखोल चौकशी करून वरिष्ठ पातळीवरून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.