

Sengaon Goregaon Water Crisis
गोरेगाव : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे ऐन हिवाळ्यातच पाणीटंचाई निर्माण झाल्याने महिलांचा संताप उफाळून आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने संतप्त झालेल्या शेकडो महिलांनी डोक्यावर रिकामे हांडे आणि घागरी घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला. महिलांनी ग्रामपंचायतीला घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली .
गोरेगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून नळाला पाणी येत नसून हातपंपही आटले आहेत. त्यामुळे गावातील महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाण्याच्या शोधात वेळ जात असल्याने घरातील दैनंदिन कामे आणि मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होत आहे. ऐन हिवाळ्यात पाण्यासाठी अशी वणवण करावी लागत असल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.
याच पार्श्वभूमीवर शेकडो महिला रिकामे हांडे आणि घागरी घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर धडकल्या. ‘पाणी द्या, पाणी द्या’, ‘आम्हाला पाणी हवे’ अशा घोषणा देत त्यांनी ग्रामपंचायतीला घेराव घातला. ‘आम्हाला रोज पाणी हवे, केवळ आश्वासने नकोत,’ अशी ठाम भूमिका महिलांनी मांडली.
महिलांचा आक्रमक पवित्रा पाहून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची धावपळ उडाली. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले. बिघडलेली पाइपलाइन आणि मोटार दुरुस्त करून लवकरच नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मात्र, केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवणार नसल्याचे स्पष्ट करत, जोपर्यंत नळाला नियमित पाणी येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा महिलांनी दिला. या घागर मोर्चाची परिसरात चर्चा सुरू असून, गोरेगावचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.