हिंगोली : राज्यातील जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था व अडचणी दाखवून देण्याचे काम आम्ही करीत आहोत. अडचणी दाखवून दिल्यामुळे गुन्हा दाखल केला जात असेल तर एक नाही तर १०० गुन्हे दाखल करा, पण शाळा नीट करून विद्यार्थ्यांना सुविधा द्या, अशी विनंती वजा इशारा कॉक्रोज जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी शनिवारी शासनाला दिला.
तालुक्यातील लोहगाव, करंजाळा येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांच्यासह गावकरी उपस्थित होते. यावेळी दीपके यांनी शाळेतील वर्गखोल्या, बसण्यासाठी बेंच, पिण्याचे पाणी, मध्यान्ह भोजन योजनेचे मसाला पदार्थ याची पाहणी केली. यावेळी गावकऱ्यांनी शाळेतील गैरसोयींचा पाढाच वाचला. यावेळी दिपके यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या शाळांमधून सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासन व प्रशासनाकडे मागणी केली जात आहे. त्यासाठी सर्व शाळांची पाहणी केली जात आहे. या शाळांमधून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच नाही, स्वच्छगृहाची दुरावस्था झाली आहे, मध्यान्ह भोजन योजनेत अन्न शिजविण्यासाठी वापरले जाणारे मसाले पदार्थांची मुदत संपली आहे.
एकीकडे अधिकारी अन लोकप्रतिनिधींची मुले वातानुकुलीत शाळेत शिक्षण घेत आहेत तर दुसरीकडे सर्व सामान्यांचे मुले खराब वर्ग खोल्या असलेल्या शाळांमध्ये शिकत आहे हे दुर्देव असल्याचे दिपके म्हणाले. आदिवासी विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी आंदोलन करीत आहेत सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून यापुढे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष करू नये असे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील मुलांमध्येही गुणवत्ता आहे. मात्र त्यांना पुरेशा सोयी सुविधा मिळत नसल्याचे दीपके म्हणाले.