Hingoli Fraud News : व्यापाऱ्याला स्‍वस्‍त सोन्याचा मोह नडला, एकाने बनावट सोने देऊन केली फसवणूक, गुन्हा दाखल File Photo
हिंगोली

Hingoli Fraud News : व्यापाऱ्याला स्‍वस्‍त सोन्याचा मोह नडला, एकाने बनावट सोने देऊन केली फसवणूक, गुन्हा दाखल

पत्‍नीने तो सोन्याचा हार पाण्याने धुतला आणि फसवणूक झाली उघड

पुढारी वृत्तसेवा

A trader was cheated by giving him fake gold

वसमत, पुढारी वृत्तसेवा : नांदेड येथील एका व्यापाऱ्याला १५ लाखांत १ किलो सोने घेण्याचे आमिष चांगलेच महागात पडले असून आरोपींनी चक्क बनावट सोने देऊन फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आ-सेगाव टी पॉइंटवरील सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

नांदेड येथील शास्त्रीनगर भागातील व्यापारी संतोष बेलापुरे यांच्या दुकानात एक अनोळखी कुटुंब गेले होते. पुलाच्या खोदकामात सोने सापडले असून सदर सोने खरे आहे किंवा कसे हे तपासण्यासाठी आपली मदत हवी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या कुटुंबाने संतोष यांना सोन्याचे मनी दिले.

त्यांनी सराफा व्यापाऱ्याकडे जाऊन चौकशी केली असता सदर सोने खरे असल्याचे सांगितले. त्यांनतर त्या कुटुंबाने १५ लाखांत एक किलो सोने देण्याचे संतोष यांना सांगितले. कमी किमतीत एक किलो सोने मिळत असल्याने संतोष यांनी त्याची कुठेही वाच्यता केली नाही.

त्यानंतर संतोष याने सौदा झाल्यानंतर १५ लाख रुपये एकत्र केले. त्यानंतर त्या कुटुंबाने त्यांना वसमत येथील आसेगाव टी पॉइंटवर बोलावून घेतले. त्या ठिकाणी संतोष यांच्याकडून १५ लाख रुपये घेतले व त्यांना एक २० पदरी हार दिला. त्यानंतर ते कुटुंब निघून गेले.

दरम्यान, काही दिवसानंतर संतोष यांनी सदर सोने गहाण ठेवण्यासाठी बँकेत नेले असता त्या सोन्याच्या हाराबाबत त्यांच्या पत्नीला संशय आला. त्यांनी घरी येऊन हार पाण्याने धुतला असता तो काळा पडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात अर्ज दाखल केला.

मात्र सदर घटना वसमत शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे त्यांचा अर्ज वसमत शहर पोलिसांकडे वर्ग केला. यावरून पोलिसांनी दोन पुरुषांसह एका महिलेविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, सहायक पोलिस उपनिरीक्षक बालाजी मिरासे पुढील तपास करीत आहेत.

आसेगाव टी पॉइंट येथे सीसीटीव्ही असून त्याची तपासणी करून त्या फुटेजच्या आधारे त्या दोन पुरुष व एका महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT