हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : हिंगोली कनेरगाव रस्त्यावरील बासंबा जवळ भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवार (२८ मे) रोजी रात्री घडली. उषाबाई मधुकर कामखेडे (वय ५०) असे मृत महिलेचे नाव आहे.
हिंगोली तालुक्यातील ढोलउमरी येथील मधुकर भिवाजी कामखेडे व त्यांची पत्नी उषाबाई हे दुचाकीवरून शनिवारी रात्री पिंपळखुटा येथे जात होते. रात्री अकराच्या सुमारास ते हिंगोली ते कनेरगाव रस्त्यावरील बासंबाजवळ हिंगोलीकडून कनेरगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी भीषण हाेती की, उषाबाई यांचा जागीच मृत्यू झाला तर मधुकर कामखेडे गंभीर जखमी झाले.
जखमी मधुकर कामखेडे यांना प्राथमिक उपचारानंतर नांदेडला हलवण्यात आले आहे. या अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पिंपळखुटा येथील संतोष चिवडे, शंकर खंदारे, शिवराम खंदारे यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बासंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्हि. डी. श्रीमनवार, जमादार प्रवीण राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली.
हेही वाचलंत का?