हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: कळमनुरी तालुक्यातील गुंडलवाडी येथे दारू बंद करण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर दारू विक्रेत्यांनी हल्ला करून मारहाण केल्याची घटना रविवारी घडली. गावकर्यांनी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कळमनुरी तालुक्यातील गुंडलवाडी हे सुमारे १ हजार लोकसंख्येची गाव आहे. गावामध्ये मागील काही दिवसांपासून एक व्यक्ती दारू विक्री करीत होती. गावात बेकायदेशीर दारू विक्रीमुळे गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच तळीरामांचा उपद्रव वाढल्याने सायंकाळच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण झाले होते. तसेच तरुण मुले व्यसनाच्या आहारी जाऊ लागली आहेत. गावातील परिस्थिती लक्षात घेऊन सरपंच विजय डवरे यांच्यासह गावकर्यांनी दारू विक्रेत्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, दारू विक्रेत्याने सरपंच डवरे यांना मारहाण केली. तसेच इतर गावकर्यांनाही शिवगाळ केली.
दारू विक्री बंद होणार नाही, असेही त्याने गावकर्यांना खडसावले. या प्रकारामुळे गावकर्यांनी दुपारी आखाडा बाळापूर पोलिस ठाणे गाठले. त्यांनी गावातील बेकायदेशीर दारू विक्रीची कैफियत मांडली. पोलिसांनी हस्तक्षेप करून गावातील दारू विक्री तातडीने बंद करावी, अशी मागणी केली. तसेच दारू विक्रेत्याविरुद्ध तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, युवा सेनेच्या आदिवासी विभागाचे जिल्हाप्रमुख संतोष आम्ले यांनी गावकर्यांची भेट घेतली. तसेच पोलिसांना गावातील दारू विक्री बंद करण्याची विनंती केली. गावातील दारू विक्री तातडीने बंद करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा