

गोरेगाव; पुढारी वृत्तसेवा : मृग आणि आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्यांने सर्वत्र दुष्काळ दृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्याची लाट निर्माण झाली आहे. रखडलेल्या खरीप हंगाम पेरणीला प्रारंभ झाला असुन शेतकरी काळ्या आईची कुश भरण्यात व्यस्त झाला आहे
दरवर्षी मृग नक्षत्राच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीला प्रारंभ होत असतो. मात्र गेली कित्येक दिवस पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आजच्या (दि. ६) पावसाने नवचैतन्य मिळाले आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व शेताची मशागत आणि खत बियाणांची जुळवाजुळव करून ठेवली होती. मात्र मृग नक्षत्र कोरडे गेले, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेले यामुळे शेतकरी चातक पक्षासारखी पावसाची वाट बघत आकाशाकडे बघु लागले होते. यंदाच्या वर्षी वरुणराजा बरसणार की नाही ही चिंता शेतकऱ्यामध्ये व्यक्त केली जात होती. यामुळे दोन्ही नक्षत्र कोरडे गेल्याने दुष्काळ दृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. सर्व व्यवहार ठप्प झाले होते. मात्र आर्द्राच्या शेवट दोन दिवसांत वरुणराजा बरसल्याने शेतकऱ्यांत नवचैतन्याची लाट निर्माण झाली आहे.