मराठवाडा

हिंगोली : विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर आश्रमशाळेकडे विद्यार्थिनींची पाठ

अविनाश सुतार

आखाडा बाळापूर : पुढारी वृत्तसेवा : बोथी तालुका कळमनुरी येथील निवासी आश्रमशाळेमध्ये गुरुवारी (२१ जुलै ) यत्ता दहावीतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर या आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना पालकांनी घरी नेण्यास सुरुवात केली आहे. १५५ मुली पैंकी किमान ९० ते ९५ मुली आपापल्या घरी गेल्याचे वृत्त आहे.  या शाळेतील मुख्याध्यापक व गार्डनवर गुन्हे दाखल झाल्याने इतर शिक्षकांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोथी तालुका कळमनुरी येथील निवासी आश्रमशाळेच्या खोलीमध्ये इयत्ता दहावीची विद्यार्थिनी शिवानी सदाशिव वावधने (वय १६) हिने गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात २२ जुलै रोजी शवविच्छेदन करण्यात आले. विद्यार्थिनीच्या वडील व नातेवाईकाच्या फिर्यादीनुसार मुख्याध्यापक किशन खांडरे व वार्डन मॅडम सविता विनकरे या दोघांवर मुलीचा छळ केल्याच्या आरोप करण्यात आला. त्यानंतर आखाडा बाळापूर पोलिसांत दोघाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

सध्या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये घबराट पसरली आहे. अनेक पालकांनी आपल्या मुलींना या आश्रमशाळेतून घरी नेण्यास सुरुवात केली आहे. तसेच अनेक विद्यार्थी गैरहजर राहिले आहेत. या आश्रमशाळेतील अनेक शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना तयार झाली आहे. या घटनेमुळे आदिवासी आश्रमशाळेच्या शैक्षणिक वर्तुळामध्ये खळबळ माजली आहे. दरम्यान, नुकतेच आदिवासी प्रकल्प विभागाचे उपायुक्त वानखेडे तसेच प्रकल्प अधिकारी लोखंडे यांनी बोथी येथील निवासी आश्रमशाळेला भेट दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी किशोर कांबळे करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT