धक्कादायक! शेतातुन गेलेली वीज केबल कटरच्या पात्यात अडकल्याने पती पत्नीचा चिटकून जागीच मृत्यू | पुढारी

धक्कादायक! शेतातुन गेलेली वीज केबल कटरच्या पात्यात अडकल्याने पती पत्नीचा चिटकून जागीच मृत्यू

शेवगाव : शेतात काम करीत असताना वीज केबलचा प्रवाह गवत कटर मशिनमध्ये उतरल्याने शेवगाव येथील पती पत्नीचा मृत्यु झाल्याची खळबळजनक घटना शनिवार २३ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली. जालींदर एकनाथ कांबळे (वय ३३) आणि निता जालींदर कांबळे (वय २७) राहणार शेवगाव, कांबळे वस्ती असे मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत.

शनिवारी सकाळी खुंटेफळ रस्त्यावर असणाऱ्या शेतात ते कपाशी पिकातील गवत काढण्यासाठी गेल होते. मयत जालींदर याच्या हातात गवत कटर तर त्याची पत्नी निता हिच्या पाठीवर त्याचे पेट्रोल मशिन होते. गवत कापत असताना शेतातुन गेलेली केबल कटरच्या पात्यात अडकले गेल्याने त्याचा विद्युत प्रवाह मशिनमध्ये उतरला आणि दोघे पती पत्नीचा मशीनला चिटकुन मृत्यु झाला. त्यानंतर त्यांची चार वर्षाची मुलगी शेतात गेली असता हा प्रकार तिच्या लक्षात आला. तिने घरी येऊन हा प्रकार आपल्या आजी आजोबाला सांगितला. त्यांनी तातडीने शेताकडे धाव घेतली आणि आसपासच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना याची माहिती दिली. मयत पती पत्नीचे शेवगाव येथील ग्रामिन रुग्णालयात शवविच्छेदन होऊन पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

Back to top button