औरंगाबाद : उद्धव ठाकरे आजारी असतानाच शिवसेना फोडण्याचे कारस्थान – आदित्य ठाकरे | पुढारी

औरंगाबाद : उद्धव ठाकरे आजारी असतानाच शिवसेना फोडण्याचे कारस्थान - आदित्य ठाकरे

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा : कोरोनामध्ये संपूर्ण महाराष्ट्र त्रस्त असताना त्यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत होती. गद्दार आमदार-खासदार म्हणतात की आम्हाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना भेटत नव्हते. परंतु हे असत्य आहे. डिसेंबर व जानेवारीमध्ये त्यांच्यावर दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्यात व कोरोना देखील झाला होता. त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी भेटण्यासाठी मनाई केली होती म्हणून त्यांनी प्रत्यक्ष न भेटता व्हिडिओ कॉल,मोबाईलद्वारे सर्वांशी संपर्क ठेवला होता. मात्र त्याच वेळी हे गद्दार शिवसेनेच्या आमदारांना भेटून शिवसेना फोडण्याचे कारस्थान रचत होते, असा आरोप माजी मंत्री आणि युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गटावर गंगापूर येथील शिवसंवाद यात्रे दरम्यान केला आहे.

तसेच आदित्य असेही म्हणाले, जे शिवसेना सोडून गेलेत, जिथे गेले तिथे त्यांनी आनंदाने राहावे. त्यांच्याविषयी आमच्या मनात वाईट काही नाही. परंतु त्यांनी राजीनामा द्यावा व निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हानही दिले. जनता जो निर्णय देईल तो सर्वांना मान्य राहील असे म्हणत जनतेवरील विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिवसैनिक अजून आक्रमक झालेला नाही. आम्हाला आक्रमकता काय आहे ते माहित आहे. मात्र, ती आक्रमकता कोणाला दाखवायची नाही दाखवणार नाही. सध्याचे राजकारण चालले आहे ते तुम्हाला म्हणजे जनतेला पटण्यासारखे आहे का ? असं प्रश्नही त्यांनी उपस्थितांना विचारला. शिवसेनेने या गद्दारासाठी काय कमी केले. सर्व काही शिवसेनेने दिले, मंत्री पद दिले, त्यांच्यावर जास्त प्रेम केले, जास्त विश्वास ठेवला, डोळे मिटून त्यांना मिठी मारली.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मिठी मारणाऱ्याला सर्वस्व देऊनही त्याच गद्दारांनी पाठीत खंजीर खुपसला. त्यांनी नुसतीच शिवसेनेशी गद्दार केली नाही तर माणुसकीशीही गद्दारी केली आहे. या गद्दारांना तुम्ही सर्व शिवसैनिकच धडा शिकवणार याबद्दल मला काहीही शंका नाही. यावेळी पाऊस पडण्यास सुरुवात होताच पावसासारखा प्रेमाचा पाऊस माझ्यावर पडावा, असे उद्गार काढले. राजकारणात चांगल्या लोकांसाठी स्थान निर्माण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे, असे ते म्हणाले.

गंगापूर शहरांमध्ये आदित्य ठाकरे यांच्या सभेस जमलेला जनसमुदाय

गंगापूर येथील शिवसेनेची शिवसंवाद सभेसाठी माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत, नंदकुमार घोडले, लक्ष्मण सांगळे, अविनाश पाटील, दिनेश मुथा, कृष्णा पाटील डोणगावकर, मच्छिंद्र देवकर, सुभाष कानडे, नगरसेवक विजय पानकडे, भाग्येश गंगवाल, प्रकाश जैस्वाल, लक्ष्मणसिंग राजपूत, आबासाहेब शिरसाट, ऋषिकेश धाट, पोपटराव गाडेकर, किशोर मगर, श्रीलाल गायकवाड, बाळासाहेब एटकर, राजू जैस्वाल, भीमराज ठोकळ, राधेश्याम कोल्हे, गोकुळ तांगडे, राजेंद्र निकम, अर्जुन कराळे, गोविंद वल्ले, सह इत्यादी शिवसैनिक, युवा सैनिक महिला आघाडीच्या पदाधिकारी शिवसेना कार्यकर्ता व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काकासाहेब शिंदे यांना आदित्य ठाकरेंकडून अभिवादन

युवा सेना प्रमुख अदित्य ठाकरे हे गंगापूर येथील सभा आटोपून नेवासा येथील नियोजित सभेसाठी जात असताना गोदावरी नदीवरील कायगाव टोका येथे काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतिस्थळास भेट देऊन पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले.

Back to top button