मराठवाडा

हिंगोली : शेतकरी संघटनेचे नेते ब. ल. तामसकर यांचे निधन

अविनाश सुतार

औंढा नागनाथ: पुढारी वृत्तसेवा: शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते बब्रुवान लक्ष्मण तामसकर उर्फ ब. ल. तामसकर (वय ७४) यांचे आज (दि.१७) सकाळी अकरा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथील रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

चळवळीतील कार्यकर्ते, ते रोखठोक बोलणारे शेतकरी नेते अशी त्यांची ओळख होती. ते केंद्रीय कार्यकारिणीत सदस्य म्हणून होते. ४२ वर्षे त्यांनी शेतकरी संघटनेत काम केले. कापूस, ऊसदरासाठी आंदोलन, शेतकरी कर्जमाफीसाठीच्या आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते शरद जोशी यांचे विश्वासू होते. आणीबाणीमध्ये त्यांनी अडीच वर्षे कारावास भोगला होता. १० डिसेंबर १९८६ रोजी सुरेगाव येथे झालेल्या आंदोलनानंतर त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यांनी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले. त्यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. परभणी, हिंगोली जिल्ह्यात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. त्यांच्या मागे बहीण व भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT