मराठवाडा

शरद पवारांकडून घनदाट यांना गंगाखेड विधानसभेसाठी ‘ग्रीन सिग्नल’

backup backup

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सिताराम घनदाट यांनी बुधवारी (दि.१२) रोजी मुंबईतील सिल्वर ओक बंगल्यावर भेट घेतली. आगामी गंगाखेड विधानसभा मतदार संघासाठी शरद पवार यांनी माजी आमदार घनदाट यांना कामाला लागण्याचे आदेश देत थेट 'ग्रीन सिग्नल' दिल्याची माहिती माजी आमदार सीताराम घनदाट यांनी दिली आहे.

बुधवारी (दि.१२) सायंकाळी पाच वाजता माजी आमदार सिताराम घनदाट यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक बंगल्यावर भेट घेतली. राष्ट्रवादी पक्षांमध्ये नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडीमध्ये माजी आमदार सिताराम घनदाट यांनी शरद पवार यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला होता. त्यानंतरच्या पार्श्वभूमीवर बुधवारी माजी आमदार घनदाट यांनी शरद पवार यांची भेट घेत गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडीवर तसेच आगामी विधानसभा संदर्भात राजकीय चर्चा केली.

याबाबत माजी आमदार घनदाट यांनी सांगितले की, शरद पवार यांनी आपणास गंगाखेड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यासाठी थेट आशीर्वाद दिला असून कामाला लागण्याचे आदेश देत संघटनात्मक वाढीवर भर देण्याचा आदेशही दिल्याचे सांगितले आहे.

माजी आमदार सिताराम घनदाट हे मुंबईच्या अभ्युदय को ऑप शेड्युल बँकेचे संस्थापक अध्यक्ष असून मागील ३० वर्षांपासून गंगाखेड विधानसभा मतदारसंघात ते राजकीय दृष्ट्या सक्रिय आहेत. माजी आमदार घनदाट यांनी आजवर गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून तब्बल ६ वेळा अपक्षपणे निवडणूक लढविली असून यामध्ये ३ वेळेस विजय प्राप्त केला आहे. तर ३ वेळेस पराभवाचा सामना त्यांना करावा लागला आहे. दोन वर्षांपूर्वी माजी आमदार घनदाट यांनी शरद पवार यांच्याच नेतृत्वाखाली राष्ट्रवादी प्रवेश केलेला असून आगामी विधानसभेसाठी ते पुन्हा एकदा जोमाने कामाला लागणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी बोलताना दिली.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT