मराठवाडा

…तर इम्तियाज जलील यांना बिहारच्या औरंगाबादला जावे लागेल : डॉ. भागवत कराड

अविनाश सुतार

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नामांतराविरोधात आंदोलन करताना 'मी औरंगाबादेतच जन्मलो आणि माझा मृत्यू औरंगाबादेतच होणार', या खासदार इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावर केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज (दि. १२) टोला लगावला. ते म्हणाले, जलील हे औरंगाबादेत जन्मले असतील, परंतु आता या जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसांत त्यांना बिहारच्या औरंगाबादेतच जावे लागेल, तेव्हाच हे शक्य होईल. येथे राहिल्यास छत्रपती संभाजीनगर हेच नाव लागेल.

मंत्री डॉ. कराड आणि राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे आज जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात मराठवाड्यासाठी केलेल्या भरीव तरतूदींची माहिती देण्यासाठी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले आहे. त्यामुळे आता कोणीही त्यास विरोध करून शहराची शांतता भंग करण्याचे काम करू नये. शहराचा सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. खासदार जलील यांनादेखील आपले हेच आवाहन असल्याचे डॉ. कराड म्हणाले. दरम्यान, आमदार संजय शिरसाट आणि प्रदीप जैस्वाल यांनी औरंगजेबची कबर हैदराबादेत घेऊन जाण्याचे जे वक्तव्य केले. त्याचे आपण समर्थन करतो, असे सांगत डॉ. कराड म्हणाले की, त्यांचे हे वक्तव्य म्हणजे हैदराबादेतून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आलेल्या एमआयएम पक्षाने आता हैदराबादेत परत जावे, असे आहे. शिवाय जिल्ह्यातील मुस्लिम बांधवही देखील औरंगजेबच्या विरोधातच आहेत, असेही त्यांनी सांगितले.

नामांतरास विरोध करणे चुकीचे आहे. खासदार जलील यांचे साखळी उपोषण आंदोलन हे केवळ नाटक आहे. नामांतराचे राजकारण करून मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत संजय केणेकर, शहराध्यक्ष शिरिष बोराळकर, राम बुधवंत आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT