छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचे खासदार इम्‍तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचे खासदार इम्‍तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा औरंगाबादच्या नामांतराविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात मागील सात दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृती समितीचे साखळी उपोषण सुरू आहे. गुरुवारी या आंदोजनाचाच एक भाग म्हणून कँडलमार्च काढण्यात आला होता. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मोर्चा काढल्यामुळे सिटी चौक पोलिसांनी खासदारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

केंद्र व राज्य सरकारने औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सध्या जिल्ह्यात प्रक्रिया सुरू आहे. परंतु शासनाच्या या निर्णयाचा खासदार जलील यांच्यासह काही संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. या सर्व संघटना एकत्र येत त्यांनी नामांतरविरोधी कृती समिती स्थापन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

मागील सात दिवसांपासून हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून खा. जलील यांच्या नेतृत्त्वात काल (गुरुवार) सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालय ते भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णकृती पुतळ्यापर्यंत कँडल मार्च काढण्यात आला. या मार्चच्या परवानगीसाठी एमआयएमने पोलिस प्रशासनाकडे अर्ज दाखल केला होता. परंतु गुरुवारी दुपारपर्यंत परवानगी मिळाली नाही. अखेर सायंकाळी परवानगी नसतांना खा. जलील यांच्या नेतृत्वात कँडल मार्च काढण्यात आला. यात मोठ्या प्रमाणात महिला, मुले, तरुणांसह वयोवृद्ध नागरिक सहभागी होते. जमाव जमवणे आणि विनापरवानगी मोर्चा काढणे यासाठी खासदार जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :  

Back to top button