छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान @ ३४.५; येत्या आठवड्यात पुन्हा पाऊस | पुढारी

छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान @ ३४.५; येत्या आठवड्यात पुन्हा पाऊस

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून शहराच्या तापमानात सातत्याने चढ-उतार सुरू आहे. कधी कडक उन्ह सूर्यास्त होताच वातावरणात गारवा, तर कधी कडक उन्हाळ्यात पावसाचा शिडकावा होतोय. आता येणाऱ्या आठवड्यात पुन्हा एकदा शहरात पावसाचा शिडकावा होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, शहराचा पारा पस्तिशीच्या पार जात असून, शनिवारी वेधशाळेत शहराचे किमान तापमान १५. २ तर कमाल तापमान ३४.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.

शहरात ऐन उन्हाळ्यात पाऊस आणि त्यानंतर बदललेल्या वातावरणामुळे थंडी असा काहीसा प्रकार होत असून, आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार शहराला पुन्हा एकदा पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. सोमवारी १३ मार्च ते १५ मार्चदरम्यान शहरामध्ये दुपारी तसेच संध्याकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसण्याचा अंदाज असून, १६ व १७ मार्च रोजी ढगाळ वातावरणासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बदलत्या वातावरणामुळे शेतीपिकांना मोठा फटका बसत असून बळीराजा हैराण झाला आहे. महिन्याभरात शहराच्या तापमानात सातत्याने बदल होत आहे, सकाळी थंडी तर दुपारी उन्हाच्या कडाक्याने नागरिक हैराण होत आहेत. गेल्या महिन्यात १६ फेब्रुवारी रोजी शहराचे किमान तापमान ११ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३४.८ अंश सेल्सिअस असे होते, यानंतरच्या कालावधीत कधी थंडी, तर कडक उन्ह असा प्रकार होत असतानाच काही दिवसांपासून पावसाचा शिडकावा होत आहे.

आज-उद्या तापमान ३५ अंश सातत्याने वातावरणात बदल होत असला, तरी रविवार (दि. १२) तसेच सोमवारी (दि. १३) शहरात उन्हाचा कडाका जाणवणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार दोन दिवस शहराचे कमाल तापमान ३५ अंश राहणार आहे. तर १४ रोजी ३२ तर १५ ते १७ मार्च या कालावधीत तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

 

Back to top button