पंप बंद पडल्याने पाणीपुरवठा विस्कळीत pudhari photo
धाराशिव

Water crisis : पंप बंद पडल्याने पाणीपुरवठा विस्कळीत

पदाधिकाऱ्यांनी पाहणी करून घेतला आढावा

पुढारी वृत्तसेवा

भूम : शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत. प्रशासकीय काळात तब्बल 70 लाख 39 हजार 62 रुपये खर्च झाल्याचा दावा केला जात असताना, शहराला पाणीपुरवठा करणारी दुसरी मोटार गेली पाच वर्षे दुरुस्तच न केल्याची बाब समोर आली आहे. परिणामी, 28 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वाजता पर्यायी मोटारीचा अचानक बिघाड झाला आणि शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा ठप्प झाला.

या घटनेमुळे प्रशासनाच्या आर्थिक नियोजनासह देखभाल व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मोठा निधी खर्च करूनही पर्यायी यंत्रणा सक्षम न ठेवणे ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. घटनेची माहिती मिळताच पाणीपुरवठा सभापती नवनाथ रोकडे यांनी नगरसेवकांसह वंजारवाडी तलाव परिसरातील जॅकवेल येथे धाव घेतली.

जनशक्ती नगर विकास आघाडीचे गटनेते रुपेश शेंडगे, नगरसेवक आबासाहेब मस्कर व चंद्रमणी गायकवाड यांनी पाहणी करून संबंधित कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. तातडीने दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले. बिघाड झालेल्या मोटारीची देखभाल करणाऱ्या मेकॅनिकचे सुमारे 1 लाख 40 हजार रुपयांचे बिल प्रलंबित असल्याने त्यांनी सुरुवातीला घटनास्थळी जाण्यास टाळाटाळ केल्याचे उघड झाले.

अखेर पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. गटनेते रुपेश शेंडगे म्हणाले, पाणीपुरवठ्यासारख्या अत्यावश्यक सेवेत निष्काळजीपणा होत असेल, तर ते शहरासाठी धोकादायक आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आम्ही स्वतः पुढाकार घेतला. जबाबदारी निश्चित करून भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू देणार नाही. दरम्यान, नगरपरिषदेत प्रशासकीय काळात पाणी पुरवठ्यासाठी झालेल्या खर्चाचा सविस्तर लेखाजोखा नगरसेवक आबासाहेब मस्कर यांनी जॅकवेल येथे वाचून दाखवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT