एकात्मिक विकासासाठी अधिकाऱ्यांना गाव दत्तक देणार file photo
धाराशिव

एकात्मिक विकासासाठी अधिकाऱ्यांना गाव दत्तक देणार

निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

Villages will be adopted by officials for integrated development

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : पोकरा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १३८ गावांचा समावेश करण्यात आला असून या गावांचा संपूर्ण एकात्मिक विकास साधण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यात युवकांना मोबाईलपासून दूर ठेवत योगा, प्राणायाम आणि सुदर्शन क्रिया शिकविण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक अधिकाऱ्याला एक गाव दत्तक देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी विद्या-चरण कडवकर यांनी केले.

शहर पोलिस स्टेशनजवळील उस्मानाबाद क्लब मैदानावर महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त 'नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पा' अंतर्गत दि. २७ ते २९ मार्च या कालावधीत आयोजित नवतेजस्विनी महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते.

यावेळी सहायक पोलिस निरीक्षक दिनेश जाधव, महिला व बाल विकास संरक्षण अधिकारी भुजंग भोसले, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुखदेव चिंचोलीकर, लेखाधिकारी विजय स्वामी, राजाभाऊ शिंदे, सुरेंद्र कांबळे, बाबा शेख, तालुकास्तरीय लोक संचलित साधन केंद्राध्यक्ष निर्मला उबाळे, स्मिता पाटील, सुरेखा पाटील आदी उपस्थित होते.

श्री. कडवकर म्हणाले, की दुसऱ्या टप्प्यात माविमच्या ४९ गावांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण देण्यात येणार असून युवकांचे मन, मनगट आणि मस्तिष्क वळकट करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच 'माविम मित्र' म्हणून गावातील पती-पत्नींमध्ये होणाऱ्या वादांमध्ये योग्य ते समुपदेशन करून कुटुंबातील समन्वय राखण्याचे आवाहन त्यांनी केले. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी बचत गटातील महिलांनी पुढाकार घ्यावा, तसेच शेतमालाच्या पॅकिंगवर भर द्यावा.

गावातील व्यसनाधीन मुलांची माहिती संकलित करून त्यांना दोन महिन्यांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येईल. त्यांच्या आवडीनुसार कंपनी, हॉटेल्स, प्लंबर, हॉस्पिटल तसेच इतर क्षेत्रांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी चिंचोलीकर यांनी केले. सूत्रसंचालन सीएमआरसी सहव्यवस्थापक किशोर टोम्पे यांनी तर आभार विजय स्वामी यांनी मानले. महादेव पवार, श्रद्धा एडके, आकाश जोगी, निर्मला शिंदे, राजश्री ढोबळे, माया कांबळे, तालुका उपजीविका सल्लागार सिद्धांत मस्के, पांडुरंग गायकवाड, ऋषी हिंगे, संजीवनी लोंढे, आकांक्षा गायकवाड तसेच सर्व सहयोगिनी, सीआरपी, कार्यकारिणी सदस्य, माविम मित्र, स्टॉलधारक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT