वाशी : राष्ट्रीय महामार्गावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या संशयितांच्या टोळीचा पोलिसांनी पाठलाग केला. यावेळी संशयितांनी पोलिसांच्या शासकीय वाहनावर दगडफेक केली. पोलिसांनी पाठलाग सुरूच ठेवल्यानंतर संशयितांनी टाटा सुमो वाहन सोडून अंधाराचा फायदा घेत पलायन केले. वाहनाची झडती घेतली असता कोयते, कटर, सुरी, मिरची पावडरसह दरोड्याच्या तयारीसाठी लागणारे साहित्य आढळून आले. वाहनासह सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
दि. १ रोजी रात्री वाशी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर पोलिस पथक नियमित गस्तीवर होते. त्यावेळी येरमाळा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक यशवंत घोडके यांनी वाशी पोलिस ठाण्याचे चालक पोलिस कॉन्स्टेबल पवार व पोलिस कॉन्स्टेबल साठे यांना नांदगावमार्गे बोरी पाटीकडे टाटा सुमो वाहनातून सात ते आठ संशयित इसम दरोडा टाकण्याच्या उद्देशाने येत असल्याची माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिस पथकाने संशयित वाहनाचा शोध सुरू केला. दरम्यान, टाटा सुमो (एमएच २५ एटी ०६५६) आढळून आले. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने त्याकडे दुर्लक्ष करून वाहन भरधाव वेगाने पळवून नेले. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला.
पाठलागादरम्यान संशयितांनी पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करत शासकीय वाहनावर दगडफेक केली. यात शासकीय वाहनाचे नुकसान झाले. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखत पाठलाग सुरूच ठेवला. काही अंतरावर संशयितांनी टाटा सुमो सोडून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये कोयते, कटर, सुरी, मिरची पावडर तसेच दरोड्याच्या तयारीसाठी वापरण्यात येणारे अन्य साहित्य आढळून आले. वाहनासह सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
या कारवाईत येरमाळा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक यशवंत घोडके, पोलिस कॉन्स्टेबल जाधव, कळंब पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक घाडगे, पोलिस कॉन्स्टेबल गजभार, तसेच वाशी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार जाधव, पोलिस कॉन्स्टेबल सय्यद, साठे, चालक पोलिस कॉन्स्टेबल पवार व पोलिस हेड कॉन्स्टेबल जाधवर यांनी सहभाग घेतला.
वाहनचालकांत दहशत
या राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने वाहनांना लुटण्याचेही प्रकार घडतात. चालत्या वाहनांवर चढून त्यातील साहित्य चोरीच्या घटना सातत्याने घडत असतात. त्यामुळे पोलिसांनी नियमित या मार्गावर गस्त ठेवण्याची मागणी होत असते. आज पोलिसांनी केलेल्या या कारवाईतून दरोडेखोर निसटले असले तरी वाहनांतून जप्त केलेली शस्त्रे पाहता या टोळीच्या हातून होणारा मोठा अनर्थ पोलिसांनी हाणून पाडला आहे.