

अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्याशी संबंधित कथित वक्तव्यावरून डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्याभोवती वाद निर्माण झाला आहे. डीएमकेच्या एका रॅलीतील भाषणानंतर सोशल मीडियावर विविध दावे करण्यात आले आणि त्यावरून राजकीय तसेच चित्रपट क्षेत्रात चर्चा सुरू झाली. या प्रकरणात नेमके काय बोलले गेले, त्याचा संदर्भ काय होता आणि वाद कसा निर्माण झाला, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
डीएमकेचे नेते आणि विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नीलंकराई येथील त्यांच्या निवासस्थानातून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. तंजावर येथे कावेरी पाणी प्रश्नावर झालेल्या तहकुबी सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपातून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तंजावरमध्ये कावेरी पाणी तहकुबीच्या मुद्द्यावर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत उदयनिधी स्टॅलिन यांनी भाषण केले होते. यावेळी त्यांनी थलपथी विजय यांच्यावर निशाणा साधत त्यांना 'डमी मुख्यमंत्री' असे संबोधले होते. तसेच मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री केवळ चित्रपट निर्मितीमध्ये व्यस्त असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांकडे त्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला.
'त्रिशा' 'त्रिशा' घोषणा अन् पिकला हशा ...
सभेदरम्यान काही उपस्थितांकडून 'त्रिशा, त्रिशा' अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर उदयनिधी बोलताना काही वेळ थांबले आणि विजय व त्रिशा यांच्या कथित संबंधांवरून टिप्पणी केली. त्यांनी थेट कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांच्या वक्तव्याचा संदर्भ विजय आणि त्रिशाकडे असल्याचे मानले गेले.
उदयनिधी यांनी म्हटले की, विजय यांना काहीही फरक पडत नाही. पाणी कुठे पोहोचते याची चिंता नसली तरी ते एका ठिकाणी पोहोचलेच पाहिजे, असे म्हणत त्यांनी विनोद केला. त्यानंतर हसत त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचा उल्लेख कावेरी नदीच्या पाण्याबाबत होता. त्यांच्या या वक्तव्यावर सभेतील उपस्थितांमध्ये हशा पिकला आणि पुन्हा एकदा 'त्रिशा, त्रिशा' अशा घोषणा सुरू झाल्या.
यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम (टीव्हीके) पक्षाने या प्रकरणात पोलिसांकडे आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडे (एनसीडब्ल्यू) तक्रार दाखल केली होती. स्टॅलिन यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाले. त्यांना ताब्यात घेण्यापूर्वी सकाळी उदयनिधी स्टॅलिन यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी द्रमुकचे अनेक पदाधिकारी आणि समर्थक उदयनिधी यांच्या घराबाहेर पोहोचले. मोठ्या संख्येने द्रमुक कार्यकर्ते जमल्याने वातावरण काही काळ तणावाचे बनले होते.
“मी घाबरणार नाही, खोट्या बातम्यांवर कारवाई”
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलिस गाडीतून जाताना उदयनिधी स्टॅलिन यांनी माध्यमांना सांगितलं की, आपल्या वक्तव्याचा विपर्यास करून खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत.
मी जे बोललोच नाही, ते कापून-छाटून आणि वेगवेगळे भाग जोडून माझ्या नावाने चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. आज माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करून मला अटक करण्यात आली आहे. आपल्याला या कारवाईची भीती नसल्याचे सांगत त्यांनी म्हटले. मी याला घाबरणार नाही.
तंजावरमधील आंदोलनातील आपल्या भाषणाचा संदर्भ देताना उदयनिधी म्हणाले की, त्यांनी त्या सभेत जवळपास 22 मिनिटे भाषण केले होते. या संपूर्ण भाषणातून काही भाग वेगळा काढून गैरसमज निर्माण केला गेलाय.