Dharashiv Crime pudhari photo
धाराशिव

Dharashiv Crime : उमरग्यात १४ वाहनांची तोडफोड होऊनही गुन्हा दाखल नाही

दोन दिवस उलटले तरी तक्रारदार पुढे येईना; कंपन्यांच्या मौनाने संशयाचे गूढ अधिकच गडद

पुढारी वृत्तसेवा

उमरगा : शहरात पवनचक्की आणि सौरऊर्जा कंपन्यांच्या तब्बल १४ वाहनांची मध्यरात्रीच्या सुमारास तोडफोड करून धुडगूस घालण्यात आला. चार वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास एकाच वेळी घडलेल्या या घटनेला दोन दिवस उलटूनही अद्याप अधिकृत गुन्हा दाखल झालेला नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान होऊनही संबंधित कंपन्यांचे अधिकारी, वाहनमालक किंवा अन्य जबाबदार व्यक्ती तक्रार देण्यासाठी पुढे का येत नाहीत, हा प्रश्न आता चर्चेचा विषय बनला आहे. तोडफोडीपेक्षा त्यानंतरचे कंपन्यांचे मौन अधिक संशय निर्माण करणारे ठरत आहे.

शहरातील वेगवेगळ्या चार भागात असलेल्या पवनचक्की आणि सौरऊर्जा कंपन्यांशी संबंधित १४ वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. जिल्हा पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती.

मात्र, तक्रारदारच पुढे येत नसल्याने तपासाची अधिकृत दिशा काय असणार, हा प्रश्न कायम आहे. चार ठिकाणी जवळपास एकाच वेळेत तोडफोड झाल्याने हल्लेखोरांनी यापूर्वी परिसराची रेकी केली होती का? वाहनांची ठिकाणे आणि वेळेची माहिती त्यांना कोणी पुरवली? हा प्रकार पूर्वनियोजित होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

संबंधित वाहने भाडे तत्त्वावरील आहेत की कंपनीच्या अधिकाऱ्यांची, याचाही तपास महत्त्वाचा ठरणार आहे. या घटनेमागे वैयक्तिक वाद, प्रकल्पांशी संबंधित नाराजी, खंडणी की अन्य काही कारण आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, वाहनांचे नुकसान होऊनही तक्रार दाखल होत नसल्याने कंपन्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलिसांनी स्वतःहून या घटनेची दखल घेऊन वस्तुस्थिती उजेडात आणावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शहरात मध्यरात्री अशा प्रकारे धुडगूस घालण्याचे धाडस करणाऱ्यांचा शोध लागणार तरी कधी? तक्रारदारांच्या प्रतीक्षेत तपास रखडणार की पोलिस या घटनेचा स्वतंत्रपणे छडा लावणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

२०२४ मध्ये तीन दिवसांत दोघांना बेड्या!

उमरगा शहरात सन २०२४ मध्ये दुचाकी आणि महागड्या चारचाकी वाहनांची अशाच प्रकारे तोडफोड करण्यात आली होती. त्या प्रकरणात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अवघ्या तीन दिवसांत दोघांना अटक करून त्यांची शहरातून धिंड काढण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी दाखविलेली तत्परता चर्चेचा विषय ठरली होती. आता पुन्हा १४ वाहनांची तोडफोड झाली आहे. मात्र, दोन दिवस उलटूनही गुन्हा दाखल नाही. मग यावेळी पोलिसांच्या तपासाची दिशा काय असणार? आरोपींचा शोध घेण्यासाठी तक्रारीचीच प्रतीक्षा केली जाणार की पोलिस स्वतःहून पुढाकार घेणार ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT