देशभरात ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आनंद, उत्साह आणि देशभक्तीचे वातावरण असताना उमरगा येथून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत अभिमानाने उभा असलेला एक अधिकारी काही क्षणांतच काळाच्या पडद्याआड गेला आणि आनंदाच्या क्षणांवर शोककळा पसरली.
उमरगा तालुक्यातील सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावर सकाळी साडे सात ते आठच्या दरम्यान प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक मोहन भिमा जाधव (वय ५६) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देशभक्तीच्या घोषणा, अभिमानाने फडकणारा राष्ट्रध्वज आणि आनंदी वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. अत्यंत उत्साही वातावरणात कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांचा एकत्रित फोटो काढला जात होता.
मात्र याच वेळी अचानक मोहन जाधव जमिनीवर कोसळले. क्षणातच एकच गोंधळ उडाला. सहकारी कर्मचारी निळकंठ गरड, समाधान कोल्हे, एस जे घोगरे, एस पी मुंजळे, आर बी ठाकूर आदीनी प्रसंगावधान राखत त्यांना तातडीने खासगी वाहनातून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने उपस्थितांवर शोककळा पसरली. त्यांच्या निधनाची बातमी कळताच उपजिल्हा रुग्णालय परिसरात कुटुंबीयांनी आक्रोश केला. एकीकडे राष्ट्रध्वज अभिमानाने फडकत असताना दुसरीकडे एका कर्तव्यपरायण अधिकाऱ्याची जीवनयात्रा संपल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटना कमेर्यात कैद!
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावर ध्वजारोहण कार्यक्रम आटोपल्यानंतर दुय्यम निरीक्षक मोहन जाधव व सहकारी कर्मचारी यांचा एकत्रित फोटो काढला जात होता. याच क्षणी अचानक जाधव जमिनीवर कोसळल्याची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फोटोसाठी सर्वजण हसतमुख उभे असतानाच काही सेकंदांत घडलेल्या या घटनेने उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. सहकाऱ्यांनी तातडीने मदतीस धाव घेतली. आनंदाच्या क्षणातून दुःखाच्या क्षणाकडे नेणारा हा प्रसंग सर्वांनाच हादरवून टाकणारा ठरला आहे.
पाच महिन्यांपूर्वीच पदोन्नती!
मोहन जाधव यांनी अवघ्या पाच महिन्यांपूर्वी सोलापूर येथून सहाय्यक दुय्यम निरीक्षक पदावरून पदोन्नती घेत दुय्यम निरीक्षक म्हणून उमरगा येथे पदभार स्वीकारला होता. कर्तव्यनिष्ठ, मनमिळावू आणि सहकाऱ्यांमध्ये आदर असलेला अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. तर त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.