

BJP's method of contesting elections is dangerous for the country: Thorat
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा :
पैशांचा अमाप वापर, बिनविरोध निवडणुकांसाठी निर्माण केलेले दहशतीचे वातावरण, स्वायत्त संस्थांचा गैरवापर आणि द्वेषमूलक राजकारणाच्या जोरावर भाजप सध्या लोकशाहीची गळचेपी करत आहे. त्यांची निवडणूक लढविण्याची ही पद्धत देशाच्या भविष्यासाठी अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
धाराशिव दौऱ्यावर असताना बुधवारी (दि. २१) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी थोरात यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, महापालिका व नगरपालिका निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपने जागा बिनविरोध करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतींचा वापर केला, हे सर्वांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे.
केवळ सत्ता मिळवण्यासाठी पैशांचा पाऊस पाडणे आणि विरोधकांवर दबाव तंत्र वापरणे, ही प्रथा चुकीची असून ती लोकशाहीला घातक दिशेने नेणारी आहे. निवडणुका जिंकण्यासाठी स्वायत्त संस्थांचा ज्या प्रकारे गैरवापर केला जात आहे, ती बाब अत्यंत चिंताजनक आहे.
धर्मा-धर्मांमध्ये वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेणे देशाच्या एकात्मतेसाठी घातक आहे. भाजपने सत्तेसाठी देशाचे भविष्य पणाला लावू नये, असा सल्लाही थोरात यांनी दिला. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत आणि सत्ताधाऱ्यांच्या काँग्रेसला जे काही यश मिळाले आहे, ते अत्यंत निकोप आणि जनसामान्यांच्या प्रेमातून मिळालेले यश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.