

A young woman was sexually assaulted after being lured with the promise of marriage
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा लग्नाचे आमिष दाखवून एका २२ वर्षीय तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार मार्च २०२५ पासून ते १८ जा-नेवारी २०२६ पर्यंत सुरू होता. नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील तरुणाने पीडितेला लग्नाचे आश्वासन दिले होते. याच आमिषापोटी त्याने वेळोवेळी तरुणीला शेतात नेऊन तिच्यावर अमानुष लैंगिक अत्याचार केला.
पीडितेने या कृत्याचा विरोध केला असता, आरोपीने या घटनेबाबत कोणालाही सांगितल्यास तिला तसेच तिच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.
आरोपीच्या जाचाला कंटाळून अखेर पीडितेने २१ जानेवारी रोजी नळदुर्ग पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी याप्रकरणी गांभीर्याने दखल घेत आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पीडित तरुणी आणि आरोपीची ओळख उघड होऊ नये, याकरिता पोलिसांनी त्यांची नावे गोपनीय ठेवली आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.