उमरगा, जि. धाराशिव: उमरगा तालुक्यातील जकेकूर चौरस्ता ते लातूर जाणाऱ्या रस्त्यालगतच्या एका लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा मारला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, पश्चिम बंगाल येथील एका महिलेची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई रविवार, दिनांक ९ रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास करण्यात आली. प्रीतीश दिलीप सगर (वय २६, रा. गुंजोटी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील जकेकूर चौरस्ता येथील हॉटेल सागर बार अँड लॉजचा चालक आणि व्यवस्थापक (मॅनेजर) प्रीतीश दिलीप सगर (वय २६, रा. गुंजोटी, ता. उमरगा) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लॉजच्या वरच्या मजल्यावर वेश्या व्यवसाय चालवत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी तातडीने कारवाईचे नियोजन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे, पोलीस उपनिरीक्षक गजानन पुजरवाड, पांडुरंग कन्हेरे, रामहरी चाटे, पोहेका अतुल जाधव, अनुरुद्र कावळे, पोलीस नाईक नवनाथ भोरे आदी पोलीस कर्मचाऱ्यांचे एक विशेष पथक यासाठी स्थापन करण्यात आले.
रविवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास पोलिसांनी बनावट ग्राहक (Decoy Customer) लॉजमध्ये पाठवले. बनावट ग्राहकाने इशारा करताच, पोलीस पथकाने लॉजवर छापा टाकला. छाप्यात आरोपी प्रीतीश सगर हा पैशाचे आमिष दाखवून एका महिलेकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी पश्चिम बंगाल येथील एका २३ वर्षीय महिलेची सुटका केली आहे.
या कारवाईत पोलिसांनी १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात कलम १४३, १४४ भारतीय न्याय संहिता २०२३ सह कलम ३, ४, ५ अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी हे करत आहेत.