

Umarga police seize liquor worth Rs 2 lakh
उमरगा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पळसगाव तांडा तलावालगत सुरू असलेल्या दोन गावठी दारूच्या अड्ड्यावर शनिवारी, (दि ०८) सकाळी सात ते साडे आठच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात सुमारे २ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत अड्डे उध्वस्त केले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पळसगाव तांडा येथे तलावालगत गावठी दारूचे अड्डे सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसाना मिळाली. यानुसार पोलिस उप अधीक्षक सदाशिव शेलार व पोलिस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन करण्यात आले. शनिवारी सकाळी पोलिस उपनिरीक्षक गजानन पुजरवाड, पांडुरंग कन्हेरे, पोहेकॉ अतुल जाधव, अनुरूद्र कावळे, नवनाथ भोरे, श्रीकांत चौधरी, बाबा कांबळे आदि पोलिस कर्मचार्यांनी रोडवर वाहने उभी केली. गावठी दारू अड्ड्यावर धाड टाकली.
या धाडीत ३ हजार लिटर गुळ मिश्रीत रसायन, १२० हातभट्टी दारू व साहित्यासह १ लाख ३२ हजाराचा तर जवळच असलेल्या दुसऱ्या दारूच्या अड्ड्यावरील धाडीत २ हजार २०० लिटर गुळ मिश्रीत रसायन, १२० लिटर हातभट्टी दारू व साहित्यासह १ लाख ३ हजार रुपये असा दोन्ही छाप्यातील मिळून २ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत जागेवर नष्ट केला. दरम्यान पोलिसांचे पथक येत असल्याचा सुगावा लागताच जयचंद लक्ष्मण राठोड व संजय उमाजी राठोड हे झाडा झुडपांचा फायदा घेत घटना स्थळावरून प्रसार झाले. या प्रकरणी पोलिस नाईक बाबासाहेब कांबळे व पोहेकॉ श्रीमंत चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमरगा पोलिसांनी पळसगाव तांडा येथे टाकलेल्या दोन्ही धाडीत दोनशे लिटर क्षमतेच्या वेगवेगळ्या आकाराच्या बॅरल व त्यामधील गूळ मिश्रीत रसायन, प्लॅस्टिकच्या घागरीतील हातभट्टी दारू, दारू बनविण्याचे साहित्य, साधने, लोखंडी ड्रम आदी सर्व मिळून २ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जागेवर नष्ट करीत गावठी दारू अड्डे उद्ध्वस्त केले.