उमरगा : जुलै महिना अर्ध्यावर आला तरी उमरगा तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. अधूनमधून पडलेल्या किरकोळ सरींवर काही भागातील शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली असली, तरी सलग पाऊस नसल्याने पिकांच्या उगवणीसह वाढीवर गंभीर परिणाम होत आहे. दिवसेंदिवस वाढणारे ऊन, कोरडे वातावरण आणि सोसाट्याचा वारा यामुळे कोवळी पिके करपू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
उमरगा तालुका हा प्रामुख्याने कोरडवाहू शेतीचा आहे. सिंचनाच्या मर्यादित सुविधा, मोठ्या धरणांचा अभाव आणि भूजलावर असलेले अवलंबित्व यामुळे येथील शेती पूर्णपणे पावसावरच अवलंबून आहे. यावर्षी मात्र पावसाने सुरुवातीपासूनच हुलकावणी दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. तालुक्यातील एकूण ७५ हजार ४१८ हेक्टर खरीप क्षेत्रापैकी आतापर्यंत केवळ २४ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
उर्वरित क्षेत्रातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या आठवड्यापासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने शेतात ओलावा टिकून राहिलेला नाही. परिणामी, उगवलेली पिके दुपारच्या उन्हात मरगळू लागली असून पिकांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, बोअरवेल सारखी सिंचनाची सुविधा आहे, ते मोठ्या खर्चाने पिके वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र बहुतांश शेतकरी पावसा शिवाय हतबल झाले आहेत.
वेळेत दमदार पाऊस न झाल्यास पेरणीचे क्षेत्र आणखी घटण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याचबरोबर बियाणे, खते आणि मशागतीवर झालेला खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाच्या या अनिश्चिततेमुळे उत्पादनात मोठी घट, आर्थिक नुकसान आणि खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान हवामान विभागाने येत्या काही दिवसांत चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त केली असली, तरी प्रत्यक्षात दमदार पाऊस झाल्या शिवाय दिलासा मिळणार नाही. सध्या परिसरातील शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.
पाणी टंचाई आणि चाऱ्याची समस्या गंभीर!
जुलै महिना अर्धा लोटला तरी ओढे, नाले, सिमेंट बंधारे आणि लहान जलसाठे अद्याप कोरडे आहेत. भूजल पातळीतही वाढ झालेली नाही. अनेक विहिरी तसेच बोअरवेल शेवटच्या घटका मोजत आहेत. पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर पावसाअभावी जनावरांच्या चाऱ्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पशुपालक चिंतेत आहेत. तर ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यावर्षी अधूनमधून झालेल्या पावसावर सोयाबीन पेरणी केली. मात्र पावसाने पुन्हा दडी मारल्याने पिक वाढीवर परिणाम होत आहे. त्यामुळे खरीप पिकांची स्थिती चिंताजनक बनली आहे. जुलै अर्ध्यावर आला तरी दमदार पाऊस झालेला नाही. भविष्यात पिण्याच्या पाण्याची तसेच जनावरांसाठी चारा आणि पाण्याची गंभीर टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.अंकुश कोकळे शेतकरी, मुळज.