Tuljabhavani Engineering College to become government college
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाला हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. उच्च तंत्र व शिक्षण विभागाने त्यासाठी पाच तज्ञ मान्यवरांची समिती स्थापन केली आहे. पुढील सहा दिवसांत ही समिती राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे.
यामुळे तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा शासकीय महाविद्यालय होण्याचा मार्ग सुकर होणार आहे. मराठवाड्यातील हे तिसरे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय ठरणार असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ८ जुलै रोजी बैठक झाली होती. त्यात तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याच्या अनुषंगाने तसेच ही कार्यवाही सुकरपणे पार पडावी याकरिता पाच सदस्यीय तज्ञांची समिती गठित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता.
त्यानुसार बुधवार दि. ३० जुलै रोजी शासन निर्णयाद्वारे समिती स्थापन करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक किरण लाढाणे हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. तर महाराष्ट्र लेखा व कोषागार संचालनालयाच्या प्रतिनिधी डॉ. स्मिता कोकणे, तुळजापूर मंदिर समितीचे विश्वस्त तथा तहसीलदार अरविंद बोळंगे, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय डंभारे हे समितीचे सदस्य तर तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र आडेकर यांची सदस्य सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी यांनी महाविद्यालय राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याच्या अनुषंगाने जो प्रकल्प अहवाल सादर केला आहे. त्याची तपासणी करून ही समिती राज्य सरकारकडे स्वतंत्र अहवाल सादर करणार आहे.
पुढील सहा दिवसात म्हणजे ५ ऑगस्टपर्यंत राज्य सरकारकडे अहवाल सादर करावा असे उच्चतंत्र शिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन आदेशात म्हटले आहे.
श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय करण्यासाठी आपला सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू होता. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाला बळकटी मिळणार असून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षणासह मंदिर संस्थानच्या खर्चात देखील कपात होणार आहे. मराठवाड्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगप्रमाणे वेतन मिळणार आहे.राणाजगजितसिंह पाटील, आमदार, तुळजापूर.