Trains to run on the Dharashiv-Tuljapur railway line by June 2027
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : तुळजापूर येथे विमानतळ सुरू करण्याचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर करण्यात आला असून, तसेच धाराशिव-तुळजापूर रेल्वे मार्गावर जून २०२७ पर्यंत रेल्वे धावणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
प्रतिष्ठान भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आमदार पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली असून, देश नव्या उंचीवर पोहोचला आहे. शेतकरी, महिला, लघु उद्योजक तसेच विविध घटकांसाठी केंद्र सरकारने अनेक योजना राबवल्या असल्याचे त्यांनी नमूद केले.
धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, धाराशिव-तुळजापूर रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू असून, या मार्गावर जून २०२७ पर्यंत रेल्वे सेवा सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तुळजापूर येथे शिर्डीच्या धर्तीवर विकास साधण्यासाठी विमानतळाचा प्रस्ताव विमान प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला असून, भाविकांच्या सुविधेसाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जागतिक बँकेच्या मदतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पुराचे वाहून जाणारे पाणी धाराशिव जिल्ह्यात आणण्याचा प्रस्तावही सुरू असून त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.