

Naigaon Kolambi Lift Irrigation
नायगाव : नायगाव तालुक्याच्या कृषी विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा कोलंबी उपसा सिंचन प्रकल्प अखेर पूर्णत्वास आला आहे. असून बळेगाव-घुगराळा डी.सी. चेंबरपर्यंत पाणी पोहोचल्याने प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीवर शिक्कामोर्तब झाले आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कृषी समृद्धीच्या नव्या पर्वाला सुरुवात होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पाशी संलग्न असलेल्या या योजनेद्वारे बळेगाव येथून जलवाहिनीद्वारे नायगाव परिसरातील शेतीपर्यंत पाणी पोहोचविण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ३० किलोमीटर लांबीची जलवाहिनी उभारण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे नायगाव तालुक्यातील सुमारे १० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असून ३४ ते ३५ गावांतील शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे.
पावसाच्या अनियमिततेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी विविध संकटांना सामोरे जावे लागत होते. सिंचनाच्या अभावामुळे पीक उत्पादनावर परिणाम होत होता. मात्र, आता वर्षभर पाण्याची उपलब्धता निर्माण झाल्याने दुबार व तिबार पिके घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे उत्पादनवाढीसह शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सिद्धार्थ इन्फ्राटेक प्रा. लि. या कंपनीमार्फत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले. प्रकल्पाच्या यशस्वी पूर्ततेसाठी गुत्तेदार मयूर पाटील, कार्यकारी अभियंता बन्सोड तसेच कनिष्ठ अभियंता दूधगावकर यांनी विशेष योगदान दिल्याचे सांगितले जात आहे.
शासनाच्या आदेशानंतरच सिंचनासाठी पाणी वितरण
प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत उपविभागीय अभियंता अरुण आणकुलवार आणि गुत्तेदार मयूर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “डी.सी. चेंबरपर्यंत पाणी पोहोचले असून प्रकल्पाची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. काही ठिकाणी झडपा (व्हॉल्व्ह) उघड्या ठेवल्यामुळे किरकोळ गळतीची दुरुस्ती सुरू आहे. सध्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. शासनाकडून अंतिम आदेश प्राप्त झाल्यानंतरच शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देण्याबाबत निर्णय घेतला जाईल.”
अनेक वर्षे रखडलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेचे काम पूर्ण झाल्याने नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असून तालुक्याच्या आर्थिक प्रगतीलाही मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास शेतकरी व्यक्त करीत आहेत.